

लातूर : लातूर जिल्हा परिषदेचा २०२६२७ या आर्थिक वर्षासाठीचा ३७ कोटी ७८ लाख ६१ हजार रुपयांचा स्वसंपादित उत्पन्न व खर्चाचा मूळ अर्थसंकल्प विशेष सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मिना यांनी हा अर्थसंकल्प सभेपुढे मांडला. गतवर्षीचा अंर्थसंकल्प पाहता या वर्षीच्या अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची अधिक तरतूद करण्यात आली आहे.
या अर्थसंकल्पात सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला असून, विविध घटकांसाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. समाजकल्याण विभागांतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीयांसाठी २० टक्के प्रमाणे २१९.०९ लाख रुपयांची दिव्यांगांच्या जीवनमान उन्नतीसाठी ५ टक्के प्रमाणे २ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून महिला व बालकल्याणासाठी १० टक्के प्रमाणे १६६.२० लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.
यामध्ये प्रथमच एकल, विधवा, परित्यक्ता व घटस्फोटित महिलांसाठी विशेष योजनांचा समावेश करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रात प्राथमिक शाळांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी ५ टक्के प्रमाणे ४७१.०१ लाख रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.
सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागांतर्गत पाणीपुरवठ्यासाठी ३२०.०१ लाख रुपये राखीव ठेवण्यात आले असून, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष संगोपनावर १५.०१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कृषी विभागासाठी ११३.०९ लाख रुपये तर पशुसंवर्धन विभागासाठी ३०७.०३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.