

लातूर : लातूर जिल्ह्यावर निसर्गाचा मोठा कोप झाला असून, मंगळवारी सायंकाळी जळकोट आणि देवणी तालुक्यातील वलांडी परिसराला जोरदार गारपिटीने झोडपून काढले. जळकोट तालुक्यातील वांजरवाडा सर्कलमध्ये सुमारे अर्धा तास दगडासारख्या गारांचा पाऊस झाला, तर वलांडी परिसरात बोराच्या आकाराच्या गारा पडल्या. या अस्मानी संकटामुळे गहू, आंबा, टरबूज, खरबूज आणि भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले असून, काढणीला आलेला हंगाम डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाला आहे.
जळकोटमध्ये गारांचा थरार
जळकोट तालुक्यातील उमरगा रेतू, चेरा, शेलदरा या बांजरवाडा सर्कलमध्ये सायंकाळी सातच्या सुमारास काळे ढंग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीला सुरुवात झाली. ३० ते ४० मिनिटे चाललेल्या या गारांच्या माऱ्याने शेतांचे पांढऱ्या चादरीत रूपांतर झाले. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतातून घरी परतणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. जळकोट शहरासह जगळपूर, धामणगाव, वडगाव, तिरुका, कोळनूर भागातही हलका ते मध्यम पाऊस झाला.
उन्हाळी पिकांचे हवामान खराब
यावर्षी शेतकऱ्यांनी गव्हाचे विक्रमी पीक घेतले आहे, मात्र राशी होण्यापूर्वीच पावसाने गाठल्याने उभी पिके आडवी झाली आहेत. टरबूज, खरबूज आणि टोमॅटो या नगदी पिकांसह आंब्याचा मोहर गळून पडल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. गव्हाची प्रत खालावणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक गणित कोलमडले आहे. नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेता महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.
देवणी तालुक्यातील वलांडी परिसरातही हाहाकार
देवणी तालुक्यातील वलांडी परिसरातही सायंकाळी ५:१५ च्या सुमारास निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळाले. वलांडी, अचवला, दवणहिप्परगा भागात झालेल्या गारपिटीने हरभन्याचे घाटे तुटून पडले. गव्हाचे पीक भुईसपाट झाले असून, टोमॅटो उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या ज्वारीवरही पाणी फिरल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.