

Shirur Anantpal Panchayat Samiti bribery case
शिरूर अनंतपाळ: शिरूर अनंतपाळ पंचायत समितीत भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. घरकुल विभागातील एका कंत्राटी कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी (BDO) प्रशासनात शिस्त लावण्याचे प्रयत्न सुरू केलेले असतानाच ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.
गटविकास अधिकारी यांनी पंचायत समितीचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती, कामकाज व फाईल प्रणाली याकडे विशेष लक्ष दिले. प्रत्येक विभागातील टेबल तपासणी सुरू करून कार्यपद्धती शिस्तबद्ध करण्यावर भर देण्यात आला. यावेळी घरकुल विभागात बिनाफाईल बिले मंजूर होत असल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.
यानंतर “लाभार्थ्याची पूर्ण फाईल असल्याशिवाय कोणतेही काम होणार नाही” अशी स्पष्ट भूमिका गटविकास अधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे घरकुल विभागातील कामकाज पूर्णतः ठप्प झाले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी घाईघाईने लाभार्थ्यांच्या फाईली गोळा करण्यास सुरुवात केली आणि फाईलींचा ढिग साचला.
सुमारे १०० फाईली पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र प्रशासन अधिकारी चंद्रकांत कदम यांनी प्रथम फाईल तपासणी करूनच पुढे सादर करण्याची अट घातली. त्यातील ५० फाईली गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्या. तपासणीनंतर केवळ ५ फाईली पूर्ण असल्याचे स्पष्ट झाले. त्या फाईली संबंधित अभियंत्यासह प्रत्यक्ष जायमोका पाहणी करून मंजूर करण्यात आल्या व त्यानंतरच बिले अदा करण्यास सुरुवात झाली.
या प्रक्रियेमुळे बोगस बिलांना आळा बसला. कोणतेही बोगस बिल काढण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, अशी स्पष्ट तंबी कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यामुळे बोगस बिले काढणारे कर्मचारी अस्वस्थ झाले.
दरम्यान, येरोळ गणातील एका अभियंत्याविरोधात बिले काढण्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ त्यांचे काम थांबवले. संबंधित अभियंत्याला दोन महिने घरकुल विभागात बसवण्यात आले. तसेच आरी हनमंतवाडी येथील ग्रामसेवकाची तक्रार आल्यानंतर तात्काळ बदली करण्यात आली.
नियमाप्रमाणे कामकाज सुरू झाल्याने काही घटकांना गटविकास अधिकाऱ्यांचा अडथळा वाटू लागला. राजकीय दबाव वाढू लागला, “आमचा-तुमचा कर्मचारी” असे दबावतंत्र सुरू झाले. परिणामी त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल होऊ लागल्या. पंचायत समितीत शिस्त लावण्याच्या प्रयत्नात असतानाच आपल्याविरोधात तक्रारी झाल्याचे गटविकास अधिकाऱ्यांच्या लक्षातही आले नाही.
अशाच परिस्थितीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घरकुल विभागातील अभियंत्याच्या सांगण्यावर काम करणाऱ्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही नियम मोडले जात असल्याने प्रशासन अडचणीत आले असून, गटविकास अधिकारीही या घटनेमुळे बुचकळ्यात पडले आहेत.
या कारवाईमुळे पंचायत समितीतील गैरप्रकार पुन्हा एकदा उघडकीस आले असून, पुढील चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.