

Chakur Chapoli highway robbery
चाकूर : तालुक्यातील चापोली येथे राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावर लोखंडी रॉडची धमकी देत एका कुटुंबाला बुधवारी (दि.१७) पहाटे अडीच वाजता चार अज्ञात जणांनी लूट करून १ लाख ९९ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यादव किशन केंद्रे (वय ४१ रा. माळहिप्परगा ता.जळकोट) यांच्या कुटुंबातील पाच महिला आणि दोन व्यक्तींना चापोली गावात उड्डाणपुलावरून जात असताना गाडी अडवून लोखंडी रॉडने मारण्याची धमकी दाखवत त्यांच्या जवळील रोख ११ हजार रुपये, एक जुना वापरातील 5 हजार रुपयाचा मोबाईल आणि 29.5 ग्रामचे जुने वापरातील सोने ज्याची अंदाजित किंमत 1 लाख 78 रुपये तसेच चांदीचे 5 तोळ्याचे दागिने जुने वापरातील 5 हजार रुपये किंमत असा एकूण 1 लाख 99 हजार रुपयांचा ऐवज धमकी दाखवून आरोपींनी हिसकावून घेतल्या आणि घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, पोलिस निरीक्षक बालाजी भंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध घेण्यास सुरु केला आहे. यादव किशन केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार अज्ञाताविरुद्ध चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चामले हे करीत आहे.
या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आणि रात्रीच्या वेळी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून पोलीस बंदोबस्त व गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.नागरिकांनी रात्रीच्या वेळी प्रवास करताना सतर्क राहावे, तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.