

लातूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका शाळांमधील मुला-मुलींची स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा, वर्गखोल्या दुरुस्ती, सुरक्षा भिंत आणि वीज पुरवठा या मूलभूत सुविधांच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देऊन युद्धपातळीवर नियोजन व लवकरात लवकर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी.शाळानिहाय कामांचा आराखडा तयार करून कालबद्ध कार्यक्रम राबवावा, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.
पालकमंत्री भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शाळा दुरुस्ती, देखभाल व मूलभूतसुविधांबाबत आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारीअधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांच्यासह शिक्षण विभागाचे जिल्हा व तालुकास्तरीयअधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक शाळेत मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, लाईट, पंखे, पिण्याचे पाणी आणि वीज जोडणी या सुविधा अनिवार्य असल्याचे सांगून पालकमंत्री भोसले यांनी कोणत्या शाळेत कोणत्या सुविधांची गरज आहे, याची माहिती शिक्षण विभागाने तातडीने संकलित करावी आणि प्रत्यक्ष कामास विलंब न लावता सुरुवात करावी, असे सांगितले.
शाळांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध माध्यमातून उपलब्ध होणारा निधी प्राधान्याने वापरण्यात यावा. तसेच आवश्यकतेनुसार जिल्हा वार्षिक योजनेतील निधीचा वापर करून कालबद्ध कार्यक्रम राबवावा. शाळांच्या रंगरंगोटी, विद्यार्थ्यांना बाकडे या कामांसाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) मधूनही निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्री श्री. भोसले यांनी सांगितले. तसेच या कामांचा यापुढे सातत्याने आढावा घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १,२६८ शाळांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या वर्गखोल्या, स्वच्छता गृहे, विद्युत जोडणी, सुरक्षा भिंत व इतर सुविधा याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी यावेळी मांडली. लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी लातूर शहरातील शाळांबाबत माहिती दिली.
कामांचा आढावा घेतला जाणार
प्रत्येक शाळेत मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, वीज जोडणी, दिवे आणि पंखे या सुविधा अनिवार्य आहेत. कोणत्या शाळेत कोणत्या सुविधांची आवश्यकता आहे, याची माहिती शिक्षण विभागाने तातडीने संकलित करून विलंब न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी,.या कामांचा सातत्यानेआढावा घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री भोसले यांनी स्पष्ट केले.