

जालना: सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रेशन दुकानांवर पुरवला जाणारा तांदूळ आणि गहू अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून, तो जनावरेही खाणार नाहीत अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकाराकडे जिल्हा प्रशासन आणि पुरवठा विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संतप्त महिलांनी केला आहे.
दरम्यान, अखिल भारतीय किसान सभेने या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवार, दि. २५ रोजी निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले, की शासनाकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर दरमहा कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो.
मात्र, प्रत्यक्षात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि शेतमजुरांपर्यंत अत्यंत खराब अन्नधान्य पोहोचत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असतानाही जिल्हा पुरवठा अधिकारी आणि प्रशासन ‘मक्ख’ बनून बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
रेशनवरील धान्याची अन्न व औषध प्रशासनाकडून त्वरित तपासणी करावी, अशी मागणीही किसान सभेने केली आहे. रेशनवर तत्काळ चांगल्या दर्जाचे धान्य न पुरवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निकृष्ट धान्य टाकून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निकृष्ट धान्य आणून तीव्र निदर्शने केली जातील, असा जिल्हा निमंत्रक कॉ. वैजिनाथ लोंढे, बदनापूर तालुका निमंत्रक कॉ. अनिल गायकवाड आणि कॉ. बाबासाहेब पाटोळे यांनी दिला आहे.
या आहेत मागण्या..
रेशन दुकानांवर धान्य पोहोचण्यापूर्वी जिल्हाधिकारी व पुरवठा अधिकाऱ्यांनी माल तपासून तो खडे, कचरामुक्त व खाण्यायोग्य असल्याचे प्रमाणपत्र जाहीर करावे. रेशन दुकानांवर केवळ धान्य न देता साखर, खाद्यतेल आणि शासनाने जाहीर केलेल्या इतर जीवनावश्यक वस्तूंचाही नियमित पुरवठा करावा. रेशनचा माल खासगी व्यापाऱ्यांना विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून त्यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत. सर्व रेशन दुकानदारांना माल देताना तो व्यवस्थित मोजून आणि चांगल्या गुणवत्तेचाच दिला जावा.
रेशनदुकानावर मिळणाऱ्या ज्वारीमधे काडी, कचरा जास्त येत आहे. त्या ज्वारीचा पूर्ण कस गेलेला अहे. त्याची भाकर होण्यास पिठात कसलाच चिकटपणा येत नाही. त्यामुळे त्याची भाकर देखील होत नाही. शासनाने निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवठा करू नये. याकडे शासनाने लक्ष द्यावे.
सरुबाई कांबळे
मी चार घराची धुणीभांडी करून जीवन जगत आहे. रेशनचे अन्न तांदूळ आणि गहू अत्यंत खराब येत आहे. त्यात खडे, कचरा तांदुळाची चुरी, पिवळा पडलेला तांदळाचा पुरवठा करण्यात येत आहे. गरीब कष्टकऱ्यांनी हे अन्नधान्य कसे खावे? आणि बाजारातून तांदूळ विकत कसे घ्यावे.? कारण बाजारातील तांदूळ गहू फार महाग आहेत.
अमीनाबी शेख