

Healthcare System Collapse Nilanga
निलंगा : महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने राज्यातील शासकीय रुग्णालयात कायम पदावर कार्यरत असणाऱ्या परिचारिका त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयातील परिचारकांनी शुक्रवारी दि. १८ जुलैपासून येथील रुग्णालयाच्या आवारात बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. रुग्णालयातील सर्वच परिचारकांनी या आंदोलनाध्ये सहभाग नोंदवल्याने रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याच्या पूर्ततेसाठी दि.१५ व १६ जुलै रोजी मुंबई येथील आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची सरकारने दखल न घेतल्यामुळे शुक्रवारी दि. १८ जुलै रोजी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी काम बंद करून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले. वेतनामधील त्रुटी, परिचर्या संवर्गातील शुश्रूषा, शैक्षणिक व अशैक्षणिक विविध पदाच्या कायमस्वरूपी पदनिर्मिती व पदोन्नती करण्यात यावी, वाढत्या लोकसंख्येनुसार व अतिरिक्त खाटा नुसार नवीन आकृतीबंध मंजूर पदे भरण्यात यावे, परिचारीका पदभरतीतील स्त्री-पुरुष प्रमाण ८० : २० ही अट रद्द करून कायमस्वरूपी पदभरती करण्यात यावी, केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासनाने भत्ता द्यावा, पदनामात बदल करावा, सर्व रुग्णालयामध्ये पाळणाघर उपलब्ध करून द्यावे, जीएनएम विद्यार्थी परिचारिकांचे विद्यावेतन वाढवून द्यावे आदी मागण्यां करण्यात आले आहेत.
या आंदोलनात निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयातील सर्वच परिचारिकांनी सहभाग झाल्याने रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था पूर्ण पणे कोलमडली आहे. यावेळी सदरील परिचारिकांचे मागण्या दावलणाऱ्या राज्य सरकारचा निषेध करण्यात आला असून जोपर्यंत मागण्या मान्य न होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा येथील परिचारिकांनी घेतला. यावेळी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयातील सर्वच परिचारिकांनी आंदोलनात सहभागी झाले होते.