

निलंगा : राज्य शासनाने काढलेल्या नवीन वाळू धोरण 2025 नुसार निलंगा तालुक्यातील मौजे सावरी येथील गट नंबर 58 मधील जप्त केलेल्या 40 ब्रास वाळू साठ्यामधून आठ घरकुलधारक लाभार्थ्यांना ऑनलाइन पास देऊन त्यांना प्रत्येकी पाच बास प्रमाणे एकूण 40 ब्रास वाळू शासनाच्या धोरणानुसार देण्यात आली.
तालुक्यातील सावरी येथील ज्योतीराम गोपाळ भोसले, सिताराम गोपाळराव भोसले, तानाजी निवृत्ती भूतंपल्ले, भीमा रामराव मोरे, गोपाळ पांडुरंग भूतंपल्ले, बालाजी निवृत्ती भूतंपल्ले, माधव भीमराव जाधव या आठ लाभार्थ्यांना मोफत वाळू वितरित करण्यात आली. याचा शुभारंभ निलंगा उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नायब तहसीलदार, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, लाभार्थी व सावरी येथील सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी, निलंगा उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचे आभार मानले. राज्य शासनाच्या या धोरणाची पहिली अंमलबजावणी लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातून झाली आहे.