

Truck Tempo Caught with Fake Fertilizer Nilanga Market
निलंगा : निलंगा तालुक्यातील निटूर येथे अवैध मार्गाने बोगस खताची विक्री करण्यासाठी आलेला ट्रक आज (दि.३१) सकाळी ११ वाजता पकडण्यात आला. छावा संघटनेचे निलंगा तालुका अध्यक्ष तुळशीदास साळुंखे यांनी ट्रक निटूर पोलिसांच्या ताब्यात दिला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज सकाळी निटूर येथे एका खासगी पेट्रोल पंपावर दहा चाकी ट्रॅक (MH 24 J 8111) आणि आयशर टेम्पो (MH 04 FU 8231) उभा होता. या ट्रक आणि टेम्पोमध्ये सोलापूर येथील सम्राट ऍग्रो इंडस्ट्रीज या कंपनीचे खत होते. निटूर, खडक उमरगा या गावातील शेतकऱ्यांना विना पावती अल्प दरात खताची विक्री करत होते. याची माहिती छावा संघटनेला मिळताच निलंगा तालुका अध्यक्ष तुळशीदास साळुंखे यांनी घटनास्थळी येऊन ट्रक व टेम्पो निटूर पोलिसांमध्ये नेला.
यावेळी निलंगा तालुका कृषी अधिकारी नाथराव शिंदे यांच्या पथकाने पंचनामा केला. ट्रक व टेम्पो मधील खताची किंमत 2 लाख 78 हजार, व ट्रक किंमत 6 लाख, टेम्पोची किंमत 3 लाख असा एकूण 11 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. खताचे सॅम्पल तपासणीसाठी कृषी विभागाने घेतले आहे. या परिसरात खत विक्री करणारा व मुख्य एजंट सज्जन सूर्यकांत गावडे (रा. सोलापूर) , ट्रक चालक मोहसीन शेख (वय 26, रा. डोंगरज, ता. चाकूर), टेम्पो चालक विशाल हनुमंत आरीकर ( ता. शिरुर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास निटूर पोलीस चौकीचे बीट जमादार सुधीर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सांडूर करीत आहेत.
शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे बोगस खते, बियाणे घेऊ नयेत. असा प्रकार निदर्शनास आल्यास कृषी विभागाशी संपर्क करावा. निलंगा तालुक्यातील सर्व खत विक्री करणाऱ्या दुकानदारांनी खताचा शिल्लक साठा आणि किती विक्री झाल्याची माहिती फलकावर लावावी.
- नाथराव शिंदे, तालुका कृषी अधिकारी, निलंगा
निलंगा तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून कृषी अधिकाऱ्यांच्या संगनमताने सोलापूर येथील सम्राट ऍग्रो कंपनीचे बोगस अवैध खत सर्रासपणे विक्री केले जात आहे. तत्काळ याची चौकशी करून संबंधित कंपनीवर व दोषी कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
- तुळशीदास साळुंखे, (अध्यक्ष छावा संघटना), निलंगा तालुका