

निलंगा : गेल्या सहा महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने संतप्त झालेल्या निलंगा नगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी आज उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. थकीत वेतनासह अन्य मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा खंबीर पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
उपोषण सुरू करण्यापूर्वी, कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून शहरातील कचरा उचलणे बंद केले आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. "गेले सहा महिने कंत्राटदाराने पगार दिला नसल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. घर कसे चालवायचे आणि उदरनिर्वाह कसा भागवायचा, हा प्रश्न आमच्यासमोर आहे," अशी संतप्त भावना आंदोलकांनी व्यक्त केली. "लोकशाही मार्गाने न्याय मिळत नसल्याने अखेर आम्ही उपोषणाचे हत्यार उपसले आहे," असेही ते म्हणाले.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कंत्राटदार अनेक महिन्यांपासून पालिका परिसरात फिरकला नाही. पगाराबाबत विचारणा करण्यासाठी फोन केल्यास तो उचलत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
२०२१ पासूनचा थकीत पीएफ (Provident Fund) तात्काळ जमा करावा.
सहा महिन्यांचा थकीत पगार त्वरित देण्यात यावा.
सध्याचे ८,५०० रुपयांचे वेतन वाढवून १२,५०० रुपये करण्यात यावे.
"नागपंचमी आणि राखी पौर्णिमा झाली, आता गणेशोत्सव, नवरात्र आणि दसरा असे सण तोंडावर आले आहेत. सणासुदीच्या दिवसांत आणि रोजच्या गरजांसाठी आम्ही कोणाकडे पाहायचे?" असा उद्विग्न सवाल आंदोलक महिलांनी उपस्थित केला.
या आंदोलनात कोमलबाई कदम, बकुळाबाई कांबळे, कमलाबाई सुरवसे, निळकंठ जाधव, सोजराबाई शिंदे, कांताबाई सुरवसे, वनिता सुरवसे, उज्वला शिंदे, जानकाबाई कांबळे, शेषाबाई कांबळे, कस्तुराबाई कांबळे, विमला कांबळे, पवित्रा कांबळे, सुमित्रा शिंदे, हाजी देशमुख यांच्यासह एकूण ६८ कर्मचारी सहभागी झाले आहेत. दरम्यान, आज लातूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा असल्याने प्रशासनातील एकही वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी फिरकला नसल्याचे चित्र होते.