

Latur Unveiling of Gopinathrao Munde's statue Pankaja Munde
लातूर, पुढारी वृतसेवा:
आपल्या वडीलांनी आपली सदैव सोबत केली. त्यांच्या छत्रछायेत आपण वाढलो घडलो. त्यांची आमच्यावर अन आमची त्यांच्यावर खूप माया होती. अस सुख अनुभवलेली मुंडे साहेबांची लाडकी लेक मात्र ते जगाचा निरोप घेताना त्यांच्या जवळ नव्हती. सुख दुखात मला हाक मारणाऱ्या माझ्या वडीलांनी शेवटचा श्वास घेताना निश्चित मला आवाज दिला असेल पण मला तो ऐकू आला नाही. हिच वेदना जागवत गीतकार आनंद बक्शी यांच्या हर वक़्त यही है ग़म, उस वक़्त कहाँ थे हम या ओळी सांगत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावनांना वाट करुन दिली अन उपस्थितांनाही गलबलून आले. निमित्त होते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानंतर दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या जाहीर कार्यक्रमाचे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले.
माझे पिता व सर्वांचे नेता गोपीनाथराव मुंडे यांनी तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. वंचीत व बहुजनांच्या न्यायासाठी आयुष्यभर त्यांनी संघर्ष केला त्यामुळे त्यांच्या पश्चातही त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी जनता लोखॉत आहे. माझ्यासाठी पद प्रतिष्ठा वैभव मोठ नाही ही जनताच माझे वैभव आहे. लातूर आणि गोपीनाथराव मुंडे यांचे नाते अतूट आहे. गोपीनाथराव आणि विलासराव यांची मैत्री जगजाहीर होती.
मी पालकमंत्री असताना लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जिल्हा परिषदेतील पुतळा अनावरण सोहळ्याला उपस्थित होते, याची आठवण त्यांनी करून दिली. रेणापूर विधानसभा मतदारसंघ मुंडे साहेबांची कर्मभूमी होती असे सांगत त्यांनी आमदार रमेशआप्पा कराड यांना आप्पा तुम्ही या कर्मभूमीचे आमदार आहात हे तुमचे मोठे भाग्य आहे. इथल्या सर्वसामान्य माणसांच्या डोळ्यांमध्ये मुंडे साहेब दिसतात. मुंडे साहेबांनी बेरजेचे केले, काय करायचे यापेक्षा काय करायचे नाही हे मला शिकवले. राजकारण कितीही संकटे आली तरी स्वाभिमान गहाण टाकायचा नाही, ही त्यांची शिकवण होती. त्यांनी दाखविलेल्या मार्गावरच मी वाटचाल करीत आहे.
परिस्थितीसमोर मी झुकणार नाही, उतणार नाही मातणार नाही जनसेवेचा घेतला वसा टाकणार नाही असे आश्वासित करीत ताईंनी आपल्या वाणीला विराम दिला.