

लातूर : येत्या शैक्षणिक वर्षापासून आठवीचा वर्ग सुरू करणार असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगूनही वर्ग न मिळाल्याने संतप्त झालेल्या एकुरगा (ता. लातूर) येथील ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. १५) सकाळी गावातील शाळा बंद ठेवून सर्व शंभर-सव्वाशे विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषद गाठली आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनातच दिवसभर शाळा भरविली. शासन व प्रशासनाकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी जिल्हा परिषदेतच मुक्काम ठोकला.
एकुरगा येथे जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत शाळा आहे. आठवीसाठी विद्यार्थ्यांना परगावी जावे लागते. त्यामुळे राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदे-शाध्यक्ष दीपक इंगळे व ग्रामस्थांनी गावातच आठवीचा वर्ग सुरू करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर येत्या शैक्षणिक वर्षापासून आठवीचा सुरू करणार, असे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, शाळा सुरू होऊन महिना संपला तरी आठवीचा वर्ग सुरू झाला नाही.
तत्कालीन शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, गटविकास अधिकारी निवृत्ती जाधव यांनी एकुरगा येथे इयत्ता आठवीचा वर्ग सुरू करण्यास हरकत नसल्याची शिफारस केली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले, मात्र प्रत्यक्षात वर्ग सुरूच झाला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा निषेध करत एकुरगा ग्रामस्थ पालकांनी जिल्हा परिषद सीईओच्या दालनातच विद्यार्थ्यांना सोबत घेऊन राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दीपक इंगळे यांच्या नेतृत्वात शाळा भरवली. सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत विद्यार्थी सदर ठिकाणी बसून राहिले. डब्बा तिथेच खाल्ला व आज रात्रभर दालनातच मुक्काम करणार असल्याचे दीपक इंगळे यांनी सांगितले. पालकांची मागणी लक्षात घेता पुणे संचालक कार्यालयात वर्ग मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल अशी तात्पुरती समज पालकांना देण्यात आली. त्यानंतरही पालक आग्रही होत चालल्यानंतर शिक्षण विभागाकडून १५ एप्रिल २०२५ च्या शासन आदेशाचा हवाला देत पट संख्या आणि इतर कारणे दाखवून आठवीचा वर्ग देण्यात येणार नसल्याचे पत्र दिले आहे. मात्र येथील पालकांनी मागणी मान्य होईपर्यंत शाळा बंद ठेवून जिल्हा परिषदेत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. दरम्यान, याबाबत विचारणा करण्यासाठी शिक्षणाधिकारी दत्तात्रय मठपती यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साघला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
शासन निर्णयानुसार तीन किमी अंतराच्या आत एकाच वर्गाला मान्यता देता येणार नाही. तसेच पहिली ते पाचवीसाठी पटसंख्या ३० आणि सहावी व सातवीच्या वर्गासाठी पटसंख्या ३५ असावी, असा नियम आहे. त्यामुळे एकुरगा गावात आठवीला मान्यता देता येत नाही, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. मात्र मुरुड येथील पारुनगरमध्ये ३ किमीपेक्षा कमी अंतरात शाळेला मान्यता देण्यात आली आहे, त्याचा नियमानुसार एकरगा येथेही मान्यता द्यावी, अशी आमची मागणी असल्याचे राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दीपक इंगळे यांनी सांगितले.