

जत : जत तालुक्यातील बसर्गी येथील जिताणी वस्तीवर जिल्हा परिषद वस्तीशाळेचे पहिली ते चौथीचे वर्ग नादुरुस्त पत्र्याच्या शेडमध्ये भरत आहेत. खासगी जागेत नादुरुस्त व गंजलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. पावसाळ्यात पाणी, उन्हाळ्यात चहू बाजूंनी पत्रा असल्याने तीव्र तापमान, दुसरीकडे साप, उंदीर, घुशी यांचा वावर असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. परिणामी, पालक विद्यार्थी शाळेत पाठविण्यास राजी होत नसल्याचे चित्र आहे.
जत दक्षिण भागातील कर्नाटक सीमावर्ती भागात बसर्गी गाव आहे. अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर कर्नाटक सीमेलगत असून कन्नड भाषेचा प्रभाव असूनही जिल्हा परिषद मराठी शाळेचे अस्तित्व टिकून आहे. बसर्गीपासून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाटकातील रामतीर्थ देवस्थानाच्या (ता. अथणी, जि. बेळगाव) इनाम जमिनी असा शेरा येथील जमिनीवर आहे. गेली कित्येक वर्षे या शेर्यामुळे गावातील जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णतः बंद आहेत. याचा फटका बसर्गी येथील जिल्हा परिषदेच्या तिन्ही शाळांना बसला आहे. जागा उपलब्ध होत नसल्याने तिन्ही जागा बिन भाड्याच्या खोल्यात, खासगी ठिकाणी भरवल्या जात आहेत. महाराष्ट्र शासनाने बसर्गी गावचा जागा खरेदी-विक्रीचा प्रश्न मार्गी लावावा. त्याचबरोबर तिन्ही शाळांना इमारती व भौतिक सुविधा तत्काळ द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
विशेषत: जिताणी वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळा गेल्या पंधरा वर्षांपासून तुळशीराम बामणे यांच्या जागेत भरत आहे. 5 गुंठे शाळेसाठी जागा दिल्याचे सांगितले आहे. जागा उपलब्ध झाली. इमारत बांधणीचा प्रश्न रखडला आहे.
बसर्गी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर बामणे म्हणाले, जिल्हा परिषद शाळेची इमारत नसल्याने खासगी जागेत शाळा भरवावी लागत आहे. पहिली ते चौथी वर्ग असलेल्या शाळेची पटसंख्या 20 वर आली आहे. शिक्षण प्रेमी व लोकसहभागातून वर्गखोली बांधण्याचा संकल्प केला आहे. जनसामान्यांतून सहकार्याची अपेक्षा आहे.