

नांदगाव (नाशिक) : खासगी इंग्रजी शाळांकडे वाढलेला कल आणि सरकारी शाळांची घटती पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी आता ग्रामपंचायतींनाच मैदानात उतरण्याची वेळ आली आहे. नांदगाव तालुक्यातील मल्हारवाडी ग्रामपंचायतीने यासाठी गावातील जिल्हा परिषद शाळेत पाल्यांना प्रवेश द्या आणि घरपट्टी (स्थानीय कर) माफीचा लाभ घ्या अशी योजनाच सुरू केली आहे. या निर्णयाची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे.
ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या मासिक बैठकीत याबाबतचा ठराव संमत करण्यात आला आहे. याबाबत सदस्या सारिका जेजुरकर यांनी ही सूचना मांडली होती, त्याला सर्व सदस्यांनी पाठिंबा दर्शवला. उपसरपंच दीपक खैरनार यांच्या संहमतीने हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामागे सरकारी शाळांचे बळकटीकरण, विद्यार्थ्यांची संख्या वाढविणे आणि पालकांचा कल जिल्हा परिषद शाळांकडे वळविणे हा असल्याचे ग्रामपंचायतीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या निर्णयाचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना लाभ होईल असा दावा केला आहे. दरम्यान, जिल्ह्यात यापूर्वी देखील काही ग्रामपंचायतीने अशा प्रकारचा ठराव संमत करत नागरिकांनी सरकारी शाळेत मुलांना शिकविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या निर्णयाचे पालकांकडून स्वागत होत आहे.
गावातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी ग्रामपंचायत कटीबद्ध आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना घरपट्टी करमाफी देण्याचा निर्णय शिक्षणाला चालना देणारा ठरेल. यामुळे सरकारी शाळांचा दर्जाही उंचावेल.
दीपक खैरनार, उपसरपंच, मल्हारवाडी ता. नांदगाव, नाशिक.