

जळकोट : पाटोदा बु. (ता. जळकोट ) येथे गावाजवळील एका विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 2) दुपारी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमजान बुरहान बोडुंगे (वय : 23 वर्षे, रा. पाटोदा बु. ) हा तरुण आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. आता फक्त शेवटची उडी पाण्यात मारतो आणि मग पोहणे संपवू असे म्हणत त्याने उडी मारली. पण ही त्याच्या जीवनाची शेवटची उडी ठरली. पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पोहत असताना कदाचित गाळामध्ये फसल्याने रमजान बोडूंगे याचा मृत्यू झाला असेल असा अंदाज आहे. बराचवेळ झाला तरी तो पाण्याबाहेर येत नाही हे पाहून घाबरलेल्या मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला. त्यानंतर शेतकरी पांडुरंग तिडके (माळहिप्परगा ) हे धाडस करीत विहिरीत उतरले. रमजानचा शोध घेतला पण या प्रयत्नाला उशीर होता. तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. त्यांच्या हाती मृतदेहच लागला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर तरुणाला पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र, त्याला वाचवता आले नाही. मयत रमजान याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय जळकोट येथे उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला असून 3 मे रोजी शवविच्छेदन होईल असे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.