

बालाजी फड
लातूर : राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. तब्बल तीन वर्षांपासून रखडलेल्या लातूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. लातूर महानगरपालिकेत 18 प्रभागांमध्ये 50 जागांसाठी महासंग्राम होणार आहे. कधी एकदाची निवडणूक लागते, अशा प्रतीक्षेत असलेल्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.
लातूर नगर परिषद अस्तित्वात आल्यापासून ते महानगरपालिका झाल्यानंतर पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीपर्यंत म्हणजे 2017 सालापर्यंत या स्थानिक स्वराज्य संस्थेवर काँग्रेसचा झेंडा कायम फडकत होता. 25 ऑक्टोबर 2011 रोजी लातूर नगर परिषदेची महानगरपालिका झाली आणि 20 एप्रिल 2012 रोजी पहिली पंचवार्षिक निवडणूक पार पडली.
या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 51 जागा जिंकून बहुमत मिळविले होते, तर प्रतिस्पर्धी भाजपाला भोपळा फोडता आला नव्हता. विरोधी पक्ष म्हणून 13 जागा जिंकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्थान मजबूत केले होते. शिवसेनेचे 3 व रिपाइं (आठवले) चे 2 सदस्य विजयी झाले होते.
दरम्यान, 2014 साली राज्यात व देशात भाजपाची सत्ता आल्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत परिवर्तनाची लाट उसळली आणि 2017 च्या महापालिका निवडणुकीत लातूरमध्ये भाजपाने काँग्रेसच्या अभेद्य गडाला सुरुंग लावला. 2012 सालच्या निवडणुकीत “झिरो“ असलेली भाजपा 36 जागा जिंकत “हिरो“ ठरली होती. हा ऐतिहासिक विजय भाजपाचे तत्कालीन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नियोजनबद्ध राजकीय डावपेचामुळे झाला होता. काँग्रेसला केवळ 33 जागा जिंकता आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस केवळ एका जागेवर विजयी तर शिवसेना व रिपाइंला खातेही उघडता आले नव्हते.
यंदा राजकीय समीकरणे बदलल्याने निवडणुकीत चुरस
लातूर महापालिकेच्या आतापर्यंतच्या दोन पंचवार्षिक निवडणुका काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि रिपाइं या राजकीय पक्षांमध्ये झाली होती. दोन्ही निवडणुका या सर्व पक्षांनी स्वबळावर लढल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत पक्षीय फुटाफुटीमुळे राजकीय समीकरणे बदललेली दिसतील. काँग्रेस व भाजपाला दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, रिपाइं, बहुजन समाज पार्टी आणि एमआयएम या पक्षांचे आव्हान असणार आहे.
वरिष्ठ पातळीवरून महापालिका निवडणुकीत आघाडी व महायुती होईल असे संकेत दिले जात असले तरी लातूरमध्ये काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला कितपत सोबत घेईल आणि भाजपा शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला किती जागा सोडेल, यावरच महायुती व महाविकास आघाडीचे भवितव्य असणार आहे.
मनपाच्या दोन सार्वत्रिक निवडणुकांतील पक्षीय बलाबल
2012
काँग्रेस 51, भाजप 0,
राष्ट्रवादी काँग्रेस 13,
शिवसेना 4, रिपाइं 2
2017
काँग्रेस 33, भाजप 36,
राष्ट्रवादी काँग्रेस 1,
शिवसेना 0, रिपाइं 0
असा आहे निवडणूक कार्यक्रम
अर्ज दाखल करणे : 23 ते 30 डिसेंबर 2025
छाननी : 31 डिसेंबर 2025
उमेदवारी अर्ज माघारी घेणे : 2 जानेवारी 2026
उमेदवारीची अंतिम यादी : 3 जानेवारी 2026
मतदान : 15 जानेवारी 2026
मतमोजणी : 16 जानेवारी 2026
3 लाख 21 हजार 354 मतदार बजावणार हक्क
लातूर मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. लातूर शहरातील 18 प्रभागांमधील 3 लाख 21 हजार 354 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रभागनिहाय मतदारसंख्या पुढीलप्रमाणे आहे. प्रभाग 1 मध्ये 20310, प्रभाग 2 मध्ये 18626, प्रभाग 3 मध्ये 17820, प्रभाग 4 मध्ये 20248, प्रभाग 5 मध्ये 16986, 6 मध्ये 17085, प्रभाग 7 मध्ये 17986, प्रभाग 8 मध्ये 20594, प्रभाग 9 मध्ये 20553, प्रभाग 10 मध्ये 19240, प्रभाग 11 मध्ये 17543, प्रभाग 12 मध्ये 19329, प्रभाग 13 मध्ये 17771, प्रभाग 14 मध्ये 16886, प्रभाग 15 मध्ये 17841, प्रभाग 16 मध्ये 15427, प्रभाग 17 मध्ये 14634 व प्रभाग 18 मध्ये 12475.