

अविनाश घोगरे
घनसावंगी ः डिजिटल युगात मोबाईल व टिव्हीच्या अति वापरामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव लक्षात घेता, तालुक्यातील रवना ग्रामपंचायतीने शैक्षणिक शिस्तीसाठी एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीने ‘अभ्यासाचे दोन तास’ हा अभिनव उपक्रम राबविण्याचा ठराव केला असून, दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत संपूर्ण गावात मोबाईल फोन आणि दूरदर्शन संच बंद ठेवण्यात येणार आहेत.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शांत, निर्भेळ व अभ्यासास अनुकूल वातावरण मिळणार असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास ग्रामपंचायत प्रशासनाने व्यक्त केला आहे. मोबाईलवरील गेम्स, सोशल मीडियाचा वाढता प्रभाव तसेच टीव्हीवरील कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग पावत असून त्याचा थेट परिणाम अभ्यासावर होत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर सामूहिक शिस्तीच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
हा महत्त्वपूर्ण निर्णय नुकत्याच पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला. ग्रामसभेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, वाढती स्पर्धा, बदलती परीक्षा पद्धती आणि अभ्यासासाठी आवश्यक असलेली एकाग्रता या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. या उपक्रमाचा लाभ शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना होणार आहे.
या उपक्रमात पालकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. या दोन तासांत पालकांनी मुलांसोबत बसून अभ्यासाची विचारपूस करणे, मार्गदर्शन करणे तसेच घरातील इतर सदस्यांनीही शांतता पाळणे अपेक्षित आहे. या ग्रामसभेला सरपंच शिवकन्या देशमुख, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आदीची उपस्थिती होती.
सायरनद्वारे वेळेची अंमलबजावणी
‘अभ्यासाचे दोन तास’ उपक्रमाची सुरुवात आणि समाप्ती ग्रामपंचायत कार्यालयातून सायरन वाजवून जाहीर केली जाणार आहे. सायंकाळी 7 वाजता पहिला सायरन वाजल्यानंतर गावातील प्रत्येक घरात मोबाईल व टीव्ही बंद ठेवले जातील, तर रात्री 9 वाजता दुसरा सायरन वाजल्यानंतर अभ्यासाचा वेळ संपल्याचे संकेत दिले जातील. सायरनमुळे वेळेचे भान राहून उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
“आज मोबाईल आणि टीव्ही हे शिक्षणातील मोठे अडथळे ठरत आहेत. मुलांच्या अभ्यासासाठी घरातील वातावरण शांत असणे अत्यावश्यक आहे. ‘अभ्यासाचे दोन तास’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वेळेची शिस्त लागेल, पालकांचा अभ्यासातील सहभाग वाढेल आणि मुलांचे लक्ष अभ्यासाकडे केंद्रीत होईल. यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य महत्वाचे आहे.”
शिवकन्या देशमुख, सरपंच रवना
“आजच्या काळात मोबाईल आणि टीव्हीमुळे मुलांचे लक्ष अभ्यासापासून दूर जात आहे. ‘अभ्यासाचे दोन तास’ हा ग्रामपंचायतीचा निर्णय अत्यंत योग्य असून यामुळे घरात शांत वातावरण तयार होत आहे. या वेळेत आम्हालाही मुलांसोबत बसून त्यांच्या अभ्यासाची माहिती घेता येते. गावाने एकत्र येऊन घेतलेला हा निर्णय मुलांच्या भविष्यासाठी निश्चितच लाभदायक ठरेल.”
संभाजी देशमुख, ग्रामस्थ