

आन्वा ः रब्बी हंगामात हरभऱ्याचे पीक सर्वाधिक आहे. या पिकावर सद्यःस्थितीत बुरशीजन्य व विषाणूजन्य अशा मरा आदी रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे उत्पादनात कमी येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.
यंदा सिंचनाची सोय असल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिके काढून हरभऱ्याची लागवड केली. अतिपावसाने आधीच खरीप हंगामातील पिकांचेही या भागात प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर रब्बीकडून अपेक्षा लागून होती. मात्र, रब्बीतील हरभरा या प्रमुख पिकावर सध्या मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने नुकसान होत आहे. त्यामुळे हरभऱ्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. सतत वातावरणाच्या बदलामुळे गहू व हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतशिवारातील उभी पिके वाळून जात आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
भोकरदन तालुक्यात खरीप हंगामात कापूस व सोयाबीन पिकाचे उत्पादन कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची सर्व भिस्त रब्बी पिकांवर आहे. त्यात शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती हरभरा, गहू, मका या पिकांस दिली आहे. मात्र, सततच्या बदलत्या वातावरणामुळे गहू, हरभरा ही पिके धोक्यात आली आहेत. प्रादुर्भावग्रस्त झाडाची पाने पिवळी पडून कोमेजतात, शेंडे मलूल होतात.
झाडांना उपटून बघितल्यास जमिनीतील काही भाग बारीक झालेला कमी आढळतो. फुलोऱ्याच्या काळात रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर झाडे एकाएकी मरायला सुरुवात होते. शेताच्या एका विशिष्ट भागामध्ये अशी बरीच झाडे मलूल झालेली आढळतात. झाडाच्या मुळापासून उभा काप घेतल्यास त्याठिकाणी काळ्या रंगाची उभी रेघ आढळून येत असल्याचे दिसून येत आहेत.
महागडी बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. अशात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने जमिनीत ओलावाही चांगला असल्याने प्रारंभी हरभरा ही पिके चांगली आली. त्यामुळे चांगले उत्पन्न होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती.
परंतु ही अपेक्षा फोल ठरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सततच्या बदलामुळे गहू, हरभरा पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ही पिके वाळत आहेत. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. पीक विम्याचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाही तर यलो मोझॅकचे ही नुकसान भरपाई अजूनपर्यंत मिळाले नाही. त्यामुळे सध्या पेरलेल्या गहू, हरभरा या पिकाचे वातावरणाच्या बदलामुळे नुकसान झाले. त्यामुळे घेतलेले कर्ज फेडावे कसे? असा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
पिकांना फटका
सध्या वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधी थंडीचा कडाका, तर कधी ढगाळ वातावरण तर कधी अवकाळी पाऊस पडत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना फटका बसत आहे.
वातावरणात बदलामुळे रब्बी हंगामातील हरभरा पीक धोक्यात आले आहे. हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे हातात आलेला हरभऱ्याच पीक हातातून जाणार असल्याची भीती शेतकऱ्यांत असून आता शेतकऱ्यांसमोर मोठ संकट उभे राहिले आहेत.
विनोद शेळके, शेतकरी कुकडी