

लातूर : एमआयडीसी परिसरात घडलेल्या सोयाबीन चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी अल्पावधीतच छडा लावत संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 14 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील व्यापारी व शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
या प्रकरणी समीर अहमद पठाण (वय 31, रा. हाडको कॉलनी, लातूर) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. 14 मार्च रोजी पहाटे 1.30 ते सकाळी 8.30 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे शटर तोडून आत प्रवेश केला व सुमारे अडीच लाखांचे 100 कट्टे सोयाबीन चोरी करून नेले होते.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास करून तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान अभिषेक सुहास यादव, सुशील सुनील नाथभजण, अजय महादेव जमदाडे, रमजान वजीर शेख, आर्यन माणिक कांबळे आणि विनोद गोविंद सुरवसे या सहा आरोपींना अटक करण्यात आली.आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली तीन पिकअप वाहने (किंमत अंदाजे12 लाख) तसेच चोरीस गेलेले 100 कट्टे सोयाबीन ( अंदाजे2.50 लाख) असा एकूण 14.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक समाधान चवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख करीत आहेत.दरम्यान, नागरिकांनी आपल्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवावी तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.