

सांगोला : सांगोला-पंढरपूर रोडवर 21 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या लुटमारीतील संशयित गौशपाक उर्फ मुन्ना, अब्दुलरजाक जमादार (रा. कोरोची, जि. कोल्हापूर) फिर्यादीचा ड्रायव्हर रामचंद्र बापू साळुंखे (वय 45 रा. गणेशनगर मांगले, जि. सांगली, सध्या रा. वळीवडे, जि. कोल्हापूर), संदीप बाबासाहेब मेडगुळे (वय 36 रा. शिवाजीनगर, कोरोची, जि. कोल्हापूर), महेश मारूती कांबळे (वय 38 रा. उचगाव, जि. कोल्हापूर) यांच्याकडून दरोडेतील 2 लाख 50 हजार रुपये व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने 30 मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे यांनी माहिती दिली की, सांगोला येथील पंढरपूर ब्रीजच्या पुढे थोड्या अंतरावर एका काळ्या रंगाची विना नंबरची कारमधील अनोळखी इसमांनी फिर्यादी दिलीप भागोजी पाटील (वय 58 रा. भोगम कॉलनी, चिंचवड, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांची चारचाकी कट का मारला असे विचारत थांबवली. त्यातील चौघांनी दिलीप यांना दमदाटी व शिवीगाळ केली आणि रोख रकमेसह लुटमार केली होती.
सांगोला पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांना तांत्रिक पुराव्याच्या आधारे गुन्ह्यातील कार ही कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसानी गौशपाक उर्फ मुन्ना, अब्दुलरजाक जमादार रा. कोरोची, यास गाडीसह ताब्यात घेतले. तेव्हा त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच फिर्यादीचा ड्रायव्हर रामचंद्र साळुंखे हा मुख्य आरोपी असून अन्य संशयीतांची नावे सांगितली. पोलिसांनी त्यांना अटक करुन 26 मार्च रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सांगोला यांचे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. 30 मार्च रोजी पर्यंत पोलिस कोठडी दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास पो.उ.नि. सागर पाटील हे करीत आहे.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखालील पो.नि. विनोद घुगे यांच्या आदेशान्वये पो.उ.नि. चंद्रकांत पुजारी, सागर पाटील, मच्छिंद्र राजगे, दत्ता वजाळे, अस्लम काझी, लक्ष्मण वाघमोडे, अमर पाटील, राहुल सोनकर यांनी केली आहे.