

कळंब (लातूर) : तालुक्यातील गौर, संजितपूर, दहिफळ भागात रविवारी (दि.21) रात्री ११ ते दोन वाजण्याच्या सुमारास अचानक ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला. तालुक्यात हा पाऊस सर्वत्र झाला असून त्यामुळे परिसरातील ओढे-नाले, तलाव काही वेळातच तुडुंब भरले. गौर येथील गावांत जाणारे रस्ते पाण्याखाली गेले. रेशन दुकान, १५ हून अधिक किराणा दुकाने, २० ते २५ हून अधिक घरात पाणी घुसले. गावाजवळ असलेल्या पोल्ट्रीफार्म मध्ये पाणी घुसून शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. घरादारात पाणी घुसल्याने शेतकरी, शेतमजूर, व्यापारी यांचा प्रपंच अक्षरशः उघड्यावर पडला आहे.
तालुक्यातील गौर, संजितपूर, दहिफळ परिसरात ढगफुटी झाली. तिन्ही गावांचे मिळून अंदाजे १० हजार हेक्टर क्षेत्र पाण्यात गेले. रात्री अकराच्या सुमारास अतिवृष्टीचा जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पाण्याचा लोंढा गावात सिरला. गावातील रस्त्यावर कधीच न वाहणारे पाणी कसं आले असे प्रश्न एकमेकांना नागरिक विचारत होते. पाण्याच्या जोर इतका होता क्षणात पाणी गावातील कुणाच्या घरात, दुकानात घुसून प्रपंच उघड्यावर पडला. पावसाच्या लोंढ्याने शेतजमिनी तुडुंब भरून वाहिल्या.
हाताशी आलेली पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. काढणीला आलेली पिके, धान्य, लागवड झालेले कांदे, संसारोपयोगी साहित्य व जनावरांच्या खाद्याचे नुकसान झाले. परिसरातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले. झालेल्या पावसाची तीव्रता एवढी होती की लागवड झालेले कांदा पीक तसेच शेतजमीन वाहून गेली. शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरासमोरील उकिरडेही पावसामुळे वाहून गेल्याचे दिसले. तालुक्यातील गौर, संजितपूर या गावाना रविवारी (दि.21) झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाचा सर्वधिक फटका गौर गावासह शेतीला बसला. गावात मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. वाहत्या पाण्याची स्पीड मोठी होती. त्यात घरासमोर उभ्या केलेल्या २७ दुचाकी वाहून गेल्या. सकाळी तेरणा नदीच्या आसपास १० ते १२ दुचाकी मिळून आल्या आहेत. असे गावातील अमोल देशमुख यांनी सांगितले. बेरोजगारीवर मात करण्यासाठी तरुण मंडळी काही तरी व्यवसाय करून प्रांपंचिक अडचण दूर करण्यासाठी धडपडतोय. गौर येथील तुका दादा शेळके यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये अतिवृष्टी झालेल्या पावसाचे पाणी घुसल्याने पोल्ट्रीमधील शेकडो कोंबड्या दगावल्या असून खाद्य भिजले आहे.
मांजरा धरणाचे अठरा दरवाजे उघडले
मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे धरणाचे अठरा दरवाजे उघडले असून नदीला पूर आला असून नदीच्या पात्राच्या सभोवतालच्या क्षेत्रातील ऊस, सोयाबीन पीक पाण्याखाली आलेले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या पुरामुळे अनेकदा शेती खरडून गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.