

मुंबई/छ. संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून दडी धरून बसलेला पाऊस राज्यात रौद्ररूप घेऊन प्रकटला. सोमवारी पहाटेपासूनच मुंबईसह सर्वदूर महाराष्ट्रात मुसळधार कोसळत आहे. याचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला. पावसाच्या तडाख्याने सहाजणांना आपले प्राण गमवावे लागले तर दोनशेहून अधिक जनावरे दगावली. मराठवाड्यातील तब्बल एक हजार गावांवर अक्षरश: आभाळ फाटले. विभागातील सुमारे 2 लाख 80 हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेली. पूर आणि अतिवृष्टीमुळे साडेचारशे घरांची पडझड झाली. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील 9 गावे आणि परिसर जलमय झाला. मुक्रमाबाद परिसरात तर जीवघेण्या जलप्रलयाने अनेक संसार उद्ध्वस्त केले. या जलप्रलयात हसनाळ येथील 5 व्यक्ती बेपत्ता झाल्या. नांदेड जिल्ह्यात पुरात 50 म्हशींचा तडफडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली; तर मुंबई शहर व उपनगरात पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत झाले.
हवामान खात्याने 17 ते 21 ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आणि नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे.
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला. त्यामुळे मदत कार्यासाठी सैन्य दलाला पाचारण करण्यात आले. विशेषतः मुखेड तालुक्यात अतिवृष्टीने लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. सुमारे 206 मि.मी. इतका पाऊस झाला. त्यामुळे रावणगाव, भासवाडी, भिंगेली, हासनाळ येथील जनजीवन प्रभावित झाले. रविवार-सोमवार दरम्यानची अतिवृष्टी आणि लेंडी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्यानंतर मुखेड तालुक्यातील पुलावरून एक मोटार पाण्यात वाहून गेली. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात शेकडो जनावरांचे बळी घेणारी यंदाच्या पावसाळ्यातील सर्वांत मोठ्या आपत्तीची नोंद मघा नक्षत्राच्या चौथ्या दिवशी झाली. लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातल्या रावणगाव, वडगाव, हसनाळ, भिंगोली, भेंडेगाव आदी काही गावांसाठी रविवारची रात्र ‘काळरात्र’ ठरली. विभागातील सुमारे 2 लाख 80 हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत.
मुंबईत तब्बल दोन आठवडे पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली होती. परंतु श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन दिवसापासून पडणार्या पावसाने सोमवारी पहाटेपासून चांगला जोर पकडला. शहर व पश्चिम उपनगरापेक्षा पूर्व उपनगरात पावसाचा जोर जास्त होता. चेंबूर परिसरात ढगफुटी सारखा पाऊस पडला. सकाळी 9 ते 10 या एक तासात चेंबूर परिसरात सर्वाधिक 65 मिमी तर 12 वाजेपर्यंत 140 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. भांडुप एलबीएस मार्ग, चेंबूर पोस्टल कॉलनी परिसरात गुडघाभर पाणी तुंबले होते. रस्त्यात तुंबलेल्या पाण्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली होती. मानखुर्द, घाटकोपर, पवई, भांडुप आदी भागातही जोरदार पाऊस पडला. हिंदमाता येथे तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उदंचन केंद्र येथील सातही पंप सुरू करण्यात आले. त्यामुळे पाण्याचा तातडीने निचरा झाला.
शहरातही महापालिका मुख्यालयासह वरळी, वडाळा, शिवडी आदी भागातही पावसाचा जोर जास्त होतात. त्या तुलनेत सकाळी पश्चिम उपनगरात काही भाग वगळता पावसाचा जोर फारसा नव्हता. दुपारनंतर मात्र पावसाचा जोर वाढला अंधेरी, बोरिवली, कांदिवली, मालाड आदी भागात पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे या भागातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीत गाड्या अडकून पडल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. त्यात सकाळपासूनच पश्चिम व मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक कोलमडून गेले होते. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. पावसाचा जोर लक्षात घेऊन काहींनी कार्यालयात न जाता घरी जाणे पसंत केले. वेधशाळेने अतिवृष्टीचा दिलेल्या इशार्यामुळे शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली.
मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी 35 पेक्षा जास्त झाडांच्या फांद्या व झाडे पडली. दहा ठिकाणी घरांच्या भिंती व काही किरकोळ भाग कोसळला. यात कोणीही जखमी झाला नसला तरी वित्तहानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दल व महापालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या कर्मचार्यांनी रस्त्यावर पडलेली झाडे तातडीने हटवून वाहतूक सुरळीत केली. गणेश मंडळांपुढे मोठ्या मूर्तींची विशेष काळजी घेण्याचे आव्हान होते.
मुंबई उपनगरात बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती स्थानापन्न झाले असून डेकोरेशनलाही सुरुवात झाली आहे. परंतु आजच्या मुसळधार पावसामुळे रस्ते व मैदानात उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये पाणी शिरल्यामुळे कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. विशेष म्हणजे पाणी शिरल्यामुळे मंडपाला होणारा वीज पुरवठा ही बंद झाला. दरम्यान मुसळधार पावसामुळे विद्युत रोषणाईची कामे तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात यावीत. मोठ्या मूर्तींची विशेष काळजी घ्या असे आवाहन गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ड. नरेश दहिबावकर यांनी केले आहे.
वेधशाळेने सोमवार 18 ऑगस्ट व मंगळवार 19 ऑगस्टला मुंबई शहर व उपनगरात रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, महापालिकेकडून सोशल मीडिया द्वारे प्रसिद्ध करण्यात येणार्या प्रत्येक सूचनेकडे विशेष लक्ष द्या, असा सल्ला महापालिकेने दिला आहे. दरम्यान आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षातील 1916 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
अरबी समुद्राला मंगळवार 19 ऑगस्टला सकाळी 9.16 वाजता मोठी भरती असून यावेळी 3.75 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गेटवे ऑफ इंडिया मरीन ड्राईव्ह या समुद्रकिनार्यासह चौपाटीवर फेरफटका मारू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. दरम्यान खबरदारीची उपायोजना म्हणून समुद्रकिनार्यालगत जीव रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
हिंगोलीत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हिंगोली जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले. येलदरी, इसापूर, सिद्धेश्वर धरण भरल्याने तिन्ही धरणांतून पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आल्याने अनेक ठिकाणी पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेले आहेत. नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे पिकांना पुराचा फटका बसला आहे.
जालना जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहत असून जिल्ह्यातील पाच मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पावसामुळे सेायाबीन, तूर, कापूस, मकासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परभणीतही अशीच स्थिती आहे.