

Cloudburst like rain Nanded
मुखेड : मुखेड तालुक्यात रविवारी (दि. १७) मध्यरात्री अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.
अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे शेतजमिनी तुडुंब भरून वाहिल्या असून हाताशी आलेले पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांचे तब्बल १०० टक्के नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. पावसाच्या पाण्याने शेतकऱ्यांची शेतीच नव्हे, तर साठवलेले धान्य, संसारोपयोगी साहित्य व जनावरांच्या खाद्यांचे नुकसान झाले.
काही गावांतील घरे पाण्याखाली गेल्याने नागरिकांना रात्रभर घराबाहेर काढून सुरक्षित ठिकाणी थांबावे लागले. शाळा, मंदिरे व उंच ठिकाणी नागरिकांनी आश्रय घेत जीव वाचवला. नुकसानीसाठी तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
मुखेड तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीवर आमदार डॉ. तुषार राठोड यांनी आढावा घेत प्रशासनाला तातडीने मदतकार्य गतिमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील व तहसीलदार राजेश जाधव यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. बचावकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी एनडीआरएफची टीम मुखेड तालुक्यात दाखल झाली असून मदतकार्य सुरू आहे.