Chakur Highway Accident | चाकूरमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा फज्जा; दुभाजकात अडकली एसटी बस

खड्ड्यात माती भरल्याचा फटका; नागरिकांना बस ढकलून काढावी लागली बाहेर
Chakur ST Bus Stuck Divider
Chakur ST Bus Stuck DividerPudhari
Published on
Updated on

Chakur ST Bus Stuck Divider

चाकूर : चाकूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला लागलेली संथगती आता वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. निकृष्ट पद्धतीने केलेल्या कामाचा फटका बुधवारी दुपारी थेट एसटी बसला बसला. बसस्थानकातून बाहेर पडलेली ‘शिवाई’ बस रस्त्याच्या दुभाजकासाठी खोदलेल्या भागात अडकली. अखेर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी धाव घेत बसला धक्का देत खड्ड्याबाहेर काढले. सार्वजनिक वाहतुकीची बस नागरिकांना ढकलावी लागल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चाकूर शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. दुभाजकासाठी खोदलेल्या भागात माती टाकून रस्त्याची पातळी समतल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, टाकलेल्या मातीची योग्यप्रकारे दबई करण्यात आली नसल्याने संबंधित भाग वाहनांसाठी धोकादायक बनला आहे.

Chakur ST Bus Stuck Divider
Latur Chakur Road Traffic: चाकूर शहरातील रस्त्याचे काम संथगतीने; वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

बुधवारी बसस्थानकातून ‘शिवाई’ बस बाहेर पडत असताना दुभाजकाच्या मध्यभागी असलेल्या या भागात बस अडकली. त्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. बस बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करूनही ती निघत नसल्याने अखेर नागरिकांनी एकत्र येत बसला धक्का दिला. नागरिकांच्या मदतीने बस खड्ड्याबाहेर काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

काम संथ; वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर

राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याने चाकूर शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. दुभाजकाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू असून, कामाच्या ठिकाणी योग्य नियोजन, सुरक्षित वाहतूक व्यवस्था आणि बांधकामाची गुणवत्ता याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

Chakur ST Bus Stuck Divider
Chakur Farmer Protest | मनरेगा गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी आंदोलन तीव्र; चाकूरमध्ये शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

काम पूर्ण होण्याची निश्चित मुदत स्पष्ट नसल्याने व्यापारी, वाहनधारक, एसटी प्रवासी तसेच शहरातील नागरिकांना सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या कामामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असून, वाहनचालकांना धोकादायक परिस्थितीतून मार्ग काढावा लागत आहे.

कंत्राटदारावर कारवाईची मागणी

कामात वारंवार अडथळे निर्माण होत असतानाही संबंधित कंत्राटदारावर ठोस कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कामाच्या गुणवत्तेची तपासणी करून दोष आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.

Chakur ST Bus Stuck Divider
Chakur Nagarpanchayt | चाकूर नगरपंचायतीत 'राजीनामा पॅटर्न'..! अवघ्या वर्षभरात दोन नगराध्यक्ष

राष्ट्रीय महामार्गाचे काम दर्जेदार, सुरक्षित आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने पाहणी करावी. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी कामाच्या ठिकाणी योग्य नियोजन व सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. रस्ते विकासासाठी सुरू असलेले कामच नागरिकांच्या त्रासाचे कारण ठरत असेल, तर या विलंबाची आणि कामाच्या गुणवत्तेची जबाबदारी निश्चित कोणाची, हा प्रश्न चाकूरकरांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news