

संग्राम वाघमारे
चाकूर : चाकूर नगरपंचायतीत गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले 'राजीनामा सत्र' आता चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहे. अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत दोन नगराध्यक्ष आणि एका उपनगराध्यक्षांना पदाचा राजीनामा द्यावा लागल्याने चाकूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, या घडामोडींमागील राजकीय समीकरणांबाबत नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्काना उधाण आले आहे. मंगळवारी (७ जुलै) नगराध्यक्ष करीम गुळवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. या निर्णयानंतर संपूर्ण तालुक्यात आणि सोशल मीडियावर राजकीय चर्चाना वेग आला आहे. विशेष म्हणजे, हा एका वर्षातील तिसरा मोठा राजीनामा असल्याने नगरपंचायतीतील सत्ता समीकरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
यापूर्वी नगरपंचायतीत प्रहार जनशक्त्ती पक्ष आणि भाजपची सत्ता असताना कपिल माकणे नगराध्यक्ष होते. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि काही नगरसेवकांच्या मदतीने अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्याची जोरदार चर्चा होती. मात्र अविश्वासाला सामोरे जाण्यापूर्वीच कपिल माकणे यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
त्या वेळी त्यांच्या राजीनाम्यामागील कारणांवर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. यानंतर उपनगराध्यक्ष अरविंद बिरादार यांच्या कार्यकाळाबाबतही अविश्वासाच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा होताच त्यांनीही पदाचा राजीनामा दिला. या घटनेने चाकूरचे राजकारण अधिकच ढवळून निघाले आणि नगरपंचायतीत राजीनामे व अविश्वासाचे नवे राजकारण सुरू झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. कपिल माकणे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे विश्वासू मानले जाणारे करीम गुळवे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली.
मात्र त्यांनाही केवळ एक वर्षाचा कार्यकाळ देण्यात आल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांनी शेवटच्या सहा महिन्यांसाठी पदाचा राजीनामा दिला. अधिकृतरीत्या आरोग्याचे कारण पुढे करण्यात आले असले, तरी राजकीय वर्तुळात या निर्णयामागे वेगळीच कारणे असल्याच्या चर्चा रंगत आहेत. गुळवे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर उघड नाराजी व्यक्त करत "ये तो झाकी है... पिक्चर अभी बाकी है..." अशा पोस्ट व्हायरल केल्या. काहींनी अप्रत्यक्षपणे पक्ष नेतृत्वावरही नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
एका वर्षात दोन नगराध्यक्ष आणि एक उपनगराध्यक्ष पदावरून पायउतार झाल्याने चाकूर नगरपंचायतीत नेमके सुरू काय आहे, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. वारंवार होणारे राजीनामे, बदलती सत्तासमीकरणे आणि वाढत्या राजकीय हालचालींमुळे चाकूरचे राजकारण पुन्हा एकदा राज्यभर चर्चेत आले असून, पुढील नगराध्यक्ष कोण आणि पुढे आणखी कोणते राजकीय भूकंप होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.