

Latur Burglary gang busted Four accused arrested
लातूर, पुढारी वृत्तसेवा : स्थानिक गुन्हे शाखेने गेल्या काही महिन्यांपासून लातूर व इतर जिल्ह्यांत सुरू असलेल्या घरफोड्या व चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला असून चौघांना जेरंबद केले आहे. त्यांच्याकडून साडेचार लाख मोलाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
६ डिसेंबर रोजी लातूर-बार्शी रोडवरील लातूर विमानतळ टी-पॉइंटवर चार संशयित आरोपी दोन मोटारसायकलीसह आढळले. स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले. अजय श्रावण शिंदे (२२, सुंभा), अर्जुन दिलीप भोसले (२७, भिवंडी /सोलापूर), केशव माणिक पवार (३०, खंडाळा) आणि विक्की सजगुऱ्या शिंदे (१९, सुंभा), अशी त्याची नावे असून त्यांच्या ताब्यातून तीन सोन्याच्या अंगठ्या, एक गंठण, कानातील फुले व रोख ३२ हजार रुपये मिळाले. तसेच चोरीच्या १ लाख ३० हजार रुपयांच्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
चौकशीत आरोपींनी त्यांनी गेल्या वर्षभरात लातूर, धाराशिव आणि विदर जिल्ह्यात २३ घरफोड्या केल्याची कबुली दिली. यामध्ये लातूर जिल्ह्यातील औसा, किल्लारी, मुरुड, रेणापूर, कासारशिरसी, लातूर ग्रामीण, गातेगाव, भादा आदी ठिकाणच्या १८ घरफोड्या. तसेच उमरगा, धाराशिव ग्रामीण, मंटाळा, मुडबी (बिदर) इत्यादी ठिकाणचे गंभीर चोरीचे एकूण ५ गुन्हे उघडकीस आले.
धाराशिव जिल्ह्यात या टोळीविर- ोधात आधीच ५७ गुन्हे नोंदलेले आहेत. एकूण जप्त मुद्देमाल ४ लाख ३७ हजारांचा आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या आदेशानव्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकातील अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी केली. पोलिसांनी नागरिकांना घरफोडी किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित जवळच्या पोलिस स्टेशन किंवा ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.