

Ratnagiri-Nagpur highway brings 'good days' to Basundi of Ujani
सौदागर पवार
बेलकुंड : रत्नागिरीनागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१वर लातूर-धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर उजनी हे छोटेसे गाव आज 'बासुंदी नगरी' म्हणून ओळखले जाते. लातूर-उस्मानाबाद सीमेवरील या गावातील बासुंदीची चव राज्यभर प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांत झालेल्या महामार्गाच्या चौपदारीकरणामुळे उजनीच्या बासुंदी व्यवसायाला मोठी चालना मिळाली असून व्यवसाय दुपटीने वाढल्याचे चित्र आहे.
उजनी गावातील बासुंदी हा गावरान दुधापासून पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा, चविष्ट आणि पौष्टिक असा पदार्थ आहे. महामार्गावरून जाणारे प्रवासी, पर्यटक, ट्रकचालक किंवा खासगी वाहनधारक प्रत्येकजण उजनीत थांबून बासुंदीची चव घेऊनच पुढे जातात. अनेक जण कुटुंबीयांसाठी पार्सल घेऊन जात असल्याने या पदार्थाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
स्थानिक व्यावसायिकांच्या मते या लोकप्रियतेत महामार्गावरील वाढलेल्या वाहतुकीचा सिंहाचा वाटा आहे. महामार्ग विकासाच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राबवलेल्या दळणवळण सुधारणा धोरणांमुळे उजनी व्यवसायाला मोठा फायदा झाला. चार वर्षांपूर्वी सोलापूर-लातूर राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करून चौपदारीकरण करण्यात आले. महामार्ग बदलामुळे बाजारपेठ उद्ध्वस्त होईल, अशी व्यापाऱ्यांमध्ये भीती होती. मात्र वास्तवात व्यवसायाला नवे उभारी मिळाली.
कोरोना काळ वगळता बासुंदी व्यवसायाने चांगली भरारी घेतली असून आज 'अच्छे दिन' आल्याचे व्यावसायिक सांगतात. महामार्ग झाल्यापासून वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. वाढत्या मागणीमुळे उजनीतील बासुंदी व्यवसाय फक्त दोनतीन हॉटेलांपुरता मर्यादित न राहता आज ४५ ते ५० हॉटेलांपर्यंत पोहोचला आहे. उच्चशिक्षित तरुणही या पारंपरिक व्यवसायात उतरू लागले आहेत. गावातील शेकडो लोकांना रोजगार मिळत असून उजनी व परिसरातील अर्थकारणाला नवसंजीवनी मिळाली आहे.
या व्यवसायामुळे उजनी आता ५० पेक्षा अधिक गावांशी व्यापारिकदृष्ट्या जोडले गेले असून गाव व्यापाराचे केंद्रबिंदू बनत आहे.
असे आहे बासुंदी पुराण
उजनीतील बासुंदीचा इतिहास सुमारे ८० वर्षापूर्वीचा आहे. जाधव, ढवण, बर्दापुरे, जोशी आदी गावांतील काही कुटुंबांनी शेतकऱ्यांकडून गावरान गाई-म्हशीचे दूध संकलित करून लहान स्वरूपात बासुंदी बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायामुळे स्थानिक दूधउत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थकारणालाही हातभार लागला. नंतर काही व्यावसायिकांनी हा व्यवसाय सोलापूरलातूर राज्य महामार्गावरील ठिकाणीही सुरू केला आणि त्यानंतर उजनीची बासुंदी राज्यभर परिचित झाली.
लाखोंची उलाढाल
दिवसाकाठी सुमारे १२०० लिटर्स दुधाची बासुंदी तयार केली जाते. उजनीसह शेजारील पाच गावे व एका तांड्यावरून दूधपुरवठा होतो. हा व्यवसाय २५० लोकांना रोजगार देतो तर १५० शेतकऱ्यांना दुग्धव्यसायातून थेट आर्थिक लाभ देतो. दिवसाकाठी तीन लाखांची उलाढाल होते.
अशी तयार होते बासुंदीनगरीची बासुंदी
हॉटेलमधील अनुभवी वस्ताद सहा तास लोखंडी कढईत दूध आटवतात. सतत हलवत, लक्षपूर्वक निरीक्षण करत लालसर रंग येईपर्यंत दूध गोठवले जाते. त्यात फक्त साखर मिसळली जाते; कोणतेही कृत्रिम फ्लेवर वापरले जात नाही. गावरान दुधातून गावरान पद्धतीने तयार होणारी ही बासुंदीच उजनीच्या प्रसिद्धीचे खरे गमक आहे.