

A 100-foot road is being made into 33 feet; Strange management of the State Road Development Board
देवणी, पुढारी वृत्तसेवा : शहरातून जात असलेला शिरूर अनंतपाळ - देवणी गुरनाळ हा रोड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बनविण्यात येत आहे. मुख्यतः हा रस्ता तळेगाव- नेकनाळ देवणी हा १०० फूट रुंदीचा आहे मात्र ३३ फुटाचा होत असल्याने प्रशासनाचा हा अजब कारभार असल्याची चर्चा शहरासह तालुक्यात आहे. शहरातील हा मोठ्या वर्दळीचा रोड असल्याने हा रोड ३३ फुटा ऐवजी मोठा करावा अशी मागणी नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून टेंभुर्णी- लातूर - शिरूर अनंतपळ देवणी गुरनाळ हा रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी रस्ते विकास महामंडळाकडून बनविण्यात येत आहे. हा रोड देवणी शहरातून कुंभार गल्ली- पुण्यश्लोक अहिल्या होळकर नगर पोलीस स्टेशन एम एस ई बी-लासोना चौक या प्रमुख वर्दळीच्या ठिकाणाहून जात आहे.
हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येत असून हा रोड १०० फुटांचा असला तरी रस्ते विकास महामंडळाकडून हा रस्ता केवळ ३३ फुटाचा बनविण्यात येत आहे. त्या रोडच्या दोन्ही बाजूस १ मीटरची नाली व १ मीटरचा शोल्डर बनविण्यात येत असल्याने हा रोड मध्यभागी घेऊन उर्वरित रोडची जागा नालीच्या दोन्ही बाजूस शिल्लक राहत आहे.
यामुळे नालीचे बांधकाम रोडच्या दोन्ही बाजूच्या टोकास म्हणजेच शंभर फूट हद्द करून त्या शेवटच्या टोकास नालीचे बांधकाम करावे. जेणेकरून रोड मोठा होईल व त्या रोडवरती नागरिकांचे अतिक्रमण ही होणार नाही. उर्वरित रोडचे काम अंदाजपत्रकाप्रमाणेच करावे अशी मागणी नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. १०० फूट रोडच्या दोन्ही टोकास नाली बांधकाम करावे व उर्वरित रोडचे काम करावे.