

लातूर : लातूर शहरातील जुनी एमआयडीसी परिसरात असलेल्या ॲल्युमिनियम कोटिंग व ॲल्युमिनियम शीट निर्मिती करणाऱ्या एका कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एक कामगार ठार, तर एक जखमी झाला. गुरुवारी (दि.16) सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दत्ता बुरांगे, (रा. प्रकाशनगर) असे मृत पावलेल्या तर अभी कुमार, (मूळ रा. उत्तर प्रदेश) असे जखमी कामगाराचे नाव आहे.
लातूर शहरात जुनी एमआयडीसी परिसरात प्लॉट क्रमांक ई-1/2 व 1/3/1 येथे मुंदडा ट्रेडर्स या नावाचा ॲल्युमिनियम कोटिंग व ॲल्युमिनियम शीट निर्मिती करणारा कारखाना आहे. गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास या कारखान्यातील कोटिंग प्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या बॉयलरचा अचानक स्फोट होऊन आग लागली व बघता बघता तिने रोद्ररूप धारण केले. आगीचे लोळ व धुराचे लोट दुरवरून दिसत होते.
घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन दल व एमआयडीसी अग्निशमन दलाच्या दलाचे 9 बंब 30 जवानांसह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तात्काळ आग विझवण्यास सुरुवात केली. मात्र आग अतिशय भडकल्याने शमविण्यासाठी त्यांना सुमारे तीन तासांपेक्षा अधिक वेळ शर्थीचे प्रयत्न करावे लागले. वाहनास 35 खेपा कराव्या लागल्या.
दरम्यान, या कारखान्यात तीन मजूर अडकले होते. त्यातील दत्ता बुरांगे यांचा मृत्यू झाला तर अन्य अभी कुमार हे गंभीर भाजले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिकेचे फायर ऑफिसर बापूसाहेब जाधव व त्यांच्या टीमने आग विझवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे व एमआयडीसी पोलिसांचेही सहकार्य लाभले. दरम्यान, फॉरेन्सिक तपासणी पथकासही पाचारण करण्यात आले असून, स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.
पोटासाठी राबणाऱ्याचा होतो कोळसा
कोणत्याही कारखान्यात दुर्घटना घडू नयेत यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती उपाययोजना करणे गरजेची असते. अतिउष्णतेमुळे, शॉर्टसर्किटमुळे आगीच्या घटना घडू शकतात. त्या घडू नयेत म्हणून तशी यंत्रणा तेथे असावी लागते. फायर सेफ्टी, लायटनिंग टॉवर, शेल्टर होम, स्थलांतर सुविधा असाव्यात व त्या असणे बंधनकारक आहे. कामगारांना लाईफ सेव्हिंग ट्रेनिंग द्यावी लागते, याबाबत बरेच कारखानदार गंभीर नसतात. कारखान्याच्या एकूण लागत मूल्याच्या 10 टक्के रक्कम ही सुरक्षेवर खर्च करणे गरजेचे असते, मात्र यासाठी हात आखडता घेतला जातो व त्याची किंमत पोटासाठी राबणाऱ्यांच्या जीवावर अशी बेतल्या जाते.
सिलिंडर्सबाबत चर्चा
आग विझवताना या काऱखान्यात अनेक गॅस सिलिंडर्स मिळून आले. ते तातडीने बाहेर मोकळ्या मैदानात टाकण्यात आले. नेमके एवढे सिलिंडर्स या कारखान्यात कशासाठी ठेवण्यात आले होते, याचा उलगडा होऊ शकला नाही. चर्चा मात्र शहरभर होती.