

निलंगा प्रतिनिधी : निलंगा तालुक्यातील सरवडी गावच्या तिन तरुणांच्या कुटुंबावर काळाने अक्षरशः घाव घातला आहे. रविवारी रात्री लामजना–लातूर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. गावाकडे परतणाऱ्या या तिघांना करजगाव पाटी येथे समोरून आलेल्या कारने ( क्र. MH14FG7172) जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत सोमनाथ दयानंद हिप्परगे (वय 22) व अभिजित शाहूराज इंगळे (वय 23) या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दिंगबर दत्ता इंगळे (वय 27) यांनीही उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. उमलत्या वयात त्यांचा झालेला मृत्यू केवळ कुटुंबीयांनाच नव्हे तर संपूर्ण गावाला असह्य ठरला आहे.
अपघाताच्या बातमीने सरवडी गावात शोककळा पसरली. एकाच गावातील तिघांचा एकाच क्षणी झालेला मृत्यू गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारा ठरला. दिवसभर नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थ या दुःखद घटनेने स्तब्ध राहिले. या अपघाताने पुन्हा एकदा रस्ते अपघातातील बेपर्वाईचे भयानक चित्र समोर आणले असून, "काळाने उमलत्या फुलांचा गंध हिरावून नेला" अशा मार्मिक शब्दात ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.