

गोरख भुसाळे
किनगाव : किनगावची लोकसंख्या लक्षात घेऊन अनेक वर्षांपूर्वी गावाला पाणी मिळावे यासाठी पाणीपुरवठा योजना किनगावपासून साधारणता अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या व्हटी मध्यम प्रकल्पातून राबविण्यात आली होती.ती योजना आता कालबाह्य झाली आहे.गावाचा विस्तार लक्षात घेऊन नवीन पाईपलाईन मंजूर करण्यात आली त्याचे काम अर्धवट झाले असून काम कासव गतीने सुरू आहे. तत्काळ काम पूर्ण करून गावाला पाणी मिळावे यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून कंत्राटदार आदेश देण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
अहमदपूर तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव म्हणून किनगावची तालुक्यातच नव्हे तर जिल्हयात ओळख आहे.गावाची गरज लक्षात घेऊन पूर्वीच्या अहमदपूर व आताच्या रेणापूर तालुक्यातील व्हटी मध्यम प्रकल्पातून किनगाव येथील नागरिकांसाठी स्टँड पोस्ट योजना अमलात आली होती. या स्टँड पोस्ट योजनेचे पुढे रूपांतर नळ योजनेत झाले. गावाचा विस्तार वाढत गेला आजतागायत गावाची लोकसंख्या तीस पस्तीस हजारांच्या जवळपास झाली आहे.
1992 च्या दरम्यान करण्यात आलेली ही जुनी पाईपलाईन योजना कुचकामी ठरत आहे. जागोजागी पाईपलाईन फुटून पाणी गळती होत आहे.त्यामुळे किनगावकरांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.जलजीवन मिशन योजने अंतर्गत किनगांव व 2 गावांच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाली व सन 2021/2022 मध्ये निविदा निघाली. त्यानंतर दोन वर्षांच्या जवळपास संबंधित गुत्तेदार यांनी काम पूर्ण करणे गरजेचे होते.मात्र प्रत्येक वेळी वेग वेगळे कारणे देऊन संबंधित विभागाचे अधिकारी व संबंधित गुत्तेदार हे कामात वेळकाढूपणा करीत असल्याचे सांगितले जाते.
गेल्या चार वर्षांपासून कासवगती पेक्षाही कमी गतीने गुत्तेदार काम करीत असल्याचे दिसत आहे.संबंधित गुत्तेदार यांना कामाला गती देण्याचे आदेश देणे गरजेचे आहे.पुढील महिन्यापासून उन्हाळ्याचे चटके बसण्यास सुरुवात होईल.पाण्याची कमतरता पहायला मिळेल.जुनी पाईपलाईन कुचकामी झाली असल्याने पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने गावाला पाणी मिळणे अवघड झाले आहे.
नवीन पाईपलाईनचे काम पूर्ण करून तत्काळ किनगावला पाणी पुरवठा सुरू करण्याकरिता संबंधित विभागाचे अधिकारी व गुत्तेदार यांनी प्रयत्न करावेत अन्यथा गावच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ प्रशासनावर येईल.अनेक भागात पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी बोर व विहिरीचा आणि टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. पाणी पुरवठा योजनेचे काम कासव गतीने होत असल्याने नागरिकांत संताप पाहायला मिळत आहे.