

किनगाव : अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील भगवंत नगर मधील सिमेंट काँक्रिट रस्ता निकृष्ट दर्जाचा करण्यात आला. या रस्त्याची खडी उघडी पडली असून रस्त्यावर धुरळा मोठ्या प्रमाणात झाला असल्याने नागरिकांना व व्यापारी बांधवांना धुळीचा नाहक सामना करावा लागत आहे.
याबाबत संबंधित रस्त्याचे काम करणाऱ्यास उपअभियंता ( बांधकाम ) जिल्हा परिषद उपविभाग अहमदपूर यांनी नोटीस बजावून सहा महिने उलटले तरी रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. निकृष्ट रस्ता तय्यार करताना संबंधित अधिकाऱ्यांनी डोळे मिटले होते का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की येथील भगवंत नगर येथील सिमेंट रस्त्याच्या कामाचा गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात मंत्री महोदय यांच्या हस्ते शुभारंभ झाला होता. रस्त्याचा दोन महिन्यांतच धुरुळा झाला.संबंधित गुत्तेदार यांनी काम निकृष्ट केले असल्याचा सूर उमटला.
त्यानंतर छावा संघटनेचे राजीव मोहगावकर यांनी दि. 4 /7 / 2025 रोजी निकृष्ट दर्जाच्या सिमेंट काँक्रिट रस्त्याची चौकशी करून संबंधीत दोषीवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशा अशयाचे पत्र उपविभागीय अभियंता जि.प. बांधकाम विभाग अहमदपूर यांना दिले होते त्या अनुषंगाने उप अभियंता बांधकाम जि.प उपविभाग अहमदपूर यांनी संबंधीतांना नोटीस बजावली होती त्यात त्यांनी योजने अंतर्गत आपल्या गावच्या भंगवत नगरमध्ये सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे काम आपल्या मार्फत पुर्ण करण्यात आलेले आहे.
सदर कामावरील आपल्या हलगर्जी पणामुळे रस्त्यावरील विअरिंगचा स्थर निघून गेलेला आहे सदर कामाचा दोष विवरण कालावधी 2 वर्षाचा असून सदर काम दुरुस्ती करणे ही आपली जबाबदारी आहे अन्यथा प्रशासकीय कारवाई करण्यात येईल अशी नोटीस देण्यात आली . मात्र नोटीस देऊन सहा महिने उलटून गेले तरी रस्ता दूरुस्ती झाली नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून या रस्त्याचा तात्काळ प्रश्न सोडवावा अशी मागणी केली जात आहे.