

देऊळगाव राजा ः तालुक्यातील नारायणखेड परिसरात अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाने पुन्हा एकदा धडक कारवाई करत दोन टिप्पर जप्त केले. मात्र, रोजच्या कारवायांनंतरही रेती माफियांचा उच्छाद कायम असल्याचे दिसून येत आहे.
नारायणखेड येथे अनधिकृत रेती वाहतूक करताना दोन टिप्पर महसूल पथकाच्या हाती लागले. यामध्ये एमएच 28 बीबी 7489 (चालक प्रविण डोईफोडे, मालक मनोज चेके, रा. तांदुळवाडी, ता. सिंदखेडराजा) व एमएच 28 बीबी 0556 (चालक अनिकेत दिनकर दोड, मालक राहुल धनवटे, रा. साखरखेर्डा) या वाहनांचा समावेश आहे.
दोन्ही वाहनांमध्ये अंदाजे प्रत्येकी 3 ब्रास रेती असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. संबंधित वाहनांना जप्त करून पुढील कारवाईसाठी देऊळगाव राजा पोलीस स्टेशन येथे अटकाव करण्यात आला आहे. ही कारवाई ग्राम महसूल अधिकारी परमेश्वर बुरुकुल, आकाश खरात, तेजस शेटे, महसूल सेवक कविता शिरसाट, शिपाई ताठे व संतोष भोपळे यांच्या पथकाने केली.
कारवाया सुरूच; माफियांचा धिंगाणा कायम
महसूल विभागाकडून सातत्याने कारवाया होत असल्या तरी प्रत्यक्षात चित्र वेगळेच दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, देऊळगाव राजा परिसरातील संत चोखामेळा धरणातून बोटीद्वारे रेती उपसा केला जात असून रात्रीच्या वेळी 70 ते 80 टिप्पर रेतीची वाहतूक करत असल्याचा आरोप आहे. “रोज दोन टिप्पर पकडले तरी उर्वरित डझनावारी टिप्पर सर्रास निसटतात,” अशी चर्चा नागरिकांतून व्यक्त होत आहे.