

Kharif crops in danger due to lack of rain
विठ्ठल कटके
रेणापूर तालुक्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. जोराचे वारे वाहत आहेत. त्यामुळे पावसाअभावी सोयाबीनचे पीक कोमेजून जात आहे. सध्या पिकांना पावसाची गरज आहे. परंतु पाऊस पडत नाही. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. अनेक शेतकरी पिके जगविण्यासाठी तुषार संचाचा वापर करीत आहेत. तर आलेली पिके हरीण व रानडुकर फस्त करीत आहेत. कीड व अळींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कीटकनाशके फवारली जात आहेत. खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. पावसाळा सुरू होऊनही पावसाने उघाड दिल्यामुळे तालुक्यावर दष्काळाचे सावट पसरले आहे.
रेणापूर तालुक्यात अवकाळी पाऊस पडला त्यानंतर मृगाच्या सुरुवातीलाहि चांगला पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या. अतिपाऊस झाल्याने कांही ठिकाणच्या जमिनी कडक झाल्या त्यातच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या कांही ठिकाणी सोयाबीन उगवले नाही तेथे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यातच आता पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन सुकत आहे.
रेणापूर तालुक्यात दरवर्षीची पावसाची सरासरी पाहता मागील दिड महिन्यात विक्रमी पाऊस झाला आहे. जुन महिना संपला तरीही पाऊस पडला नाही चार आठ दिवसात जर पाऊस झाला तरच सोयाबीन व इतर खरीपाची पीके हाती लागतील अन्यथा शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे टाकणार आहे. पिके उगवण्याच्या व वाढण्याच्या अवस्थेत असताना पावसाने गुंगारा दिल्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहत आहे. पाऊस पडेल असे वातावरण दिसते मात्र पाऊस कांही पडत नाही. खरीपाच्या पेरणीसाठी बीयाणे व खतांवर शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला आहे.
सोयाबीन या नगदी पिकांवरच शेतकऱ्यांचे वार्षीक आर्थिक नियोजन असते वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणीसाठी महागडे बीयाणे, खते व इतर खर्च उधारीवर व ऊसनवारीवर करावा लागतो कांही शेतकरी खाजगी सावकारांकडून अधिक व्याजाचे कर्ज काढून पेरणी करतात चार आठ दिवसात पाऊस झाला तरच कांहीतरी शेतकऱ्यांच्या हाती लागेल अशी सध्याची परिस्थिती ज्या शेतकऱ्यांनी पावसाच्या भरोशावर पेरण्या केल्या होत्या त्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन कोमेजुन सुकत आहे.
तर कांही ठिकाणचे पीक चक्क वाळुन जात आहे दुपारच्या वेळी पीके चक्क माना टाकीत आहेत गतवर्षी खरीपाच्या तीन टप्प्यात पेरण्या कराव्या लागल्या मागच्या वर्षी पडलेला दुष्काळ व आर्थीक संकटातुन शेतकरी अद्याप बाहेर आला नाही तर या वर्षाची स्थिती पाहता शेतकरी मोठ्या आर्थीक संकटात सापडला आहे. या वर्षी बाजारात बीयाणे, खते व किटकनाशकांच्या किंमती भरमसाठ वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट पार कोलमडून गेले आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात जनावरांच्या चाऱ्याचा, पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. पशुधन जगवायचे कसे असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा आहे.
कारेपूर, भोकरंबा, सिंधगाव, खरोळा, पानगाव परिसरात सध्या हरणाचे व रानडुकरांचे मोठ मोठे कळप दिसून येत आहेत हे कळप शेतातील कोवळी पिके फस्त करीत आहेत. यांना राखण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाअभावी पिके सुकत असताना त्यात वन्यप्राण्यांची भर पडल्याने शेतकरी धास्तावले आहेत.