

Issue of Latur's healthcare system raised in the Legislative Assembly
लातूर, पुढारी वृत्तसेवा लातूर जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होऊन अद्याप कार्यान्वित न झाल्यामुळे वाढलेला रुग्णभार, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील मनुष्यबळाची कमतरता आणि महाविद्यालयाच्या विस्तारासाठी आवश्यक रेल्वेची जागा न्यायालयीन वादात अडकून पडल्याचा मुद्दा आमदार अभिमन्यू पवार यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला.
या प्रश्नांवर शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. आमदार पवार यांनीवैद्यकीय महाविद्यालयासाठी ५०० रुग्णखाटांच्या निकषानुसार कर्मचारी मंजूर आहेत. मात्र प्रत्यक्षात ८५० रुग्णखाटांवर सेवा दिली जात असल्याने डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडत आहे. त्यामुळे वर्ग १ ते ४ मधील अतिरिक्त पदांना मंजुरी देऊन ती तातडीने भरावीत, तसेच सर्व रिक्त पदांची भरती त्वरित करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली. महाविद्यालयाच्या विस्तारासाठी आवश्यक रेल्वेची जागा शासनाने मंजूर केली असून त्याबदल्यात पुणे येथील शासनाची जमीन रेल्वे विभागाला देण्यात आली आहे.
मात्र रेल्वे विभागाने या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिल्यामुळे जागा हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली असून महाविद्यालयाच्या विस्तारीकरणालाही विलंब होत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
या प्रकरणी मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागांच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करण्याची मागणी आपण सातत्याने करत असल्याचेही पवार यांनी सांगितले.
मात्र अद्याप बैठक न झाल्याने प्रश्न प्रलंबित असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महाविद्यालयातील मंजूर व प्रस्तावित इमारतींची कामे अपूर्ण असल्याने रुग्णांना दर्जेदार आणि वेळेवर उपचार देण्यात अडचणी येत असल्याचे नमूद करत, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, अतिरिक्त पदांना मंजुरी देणे, रिक्त पदे भरणे तसेच रेल्वे विभागाशी समन्वय साधून न्यायालयीन वाद निकाली काढत विस्तारासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी विधानसभेत केली.