

Hotel Owners' Alternative: The Traditional Stove
बदनापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरासह तालुक्यात हॉटेल व्यावसायिकांना सध्या गॅस सिलेंडरच्या टंचाईचा मोठा फटका बसत असून अनेकांनी पारंपरिक चुलीचा आधार घेत व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण- इस्राईल आणि अमेरिका यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अनियमितता निर्माण झाली आहे. याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर झाला असून गॅस सिलिंडर, पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनाचा तुटवडा काही प्रमाणात जाणवू लागला आहे.
नागरिकांना घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा भासू नये, यासाठी शासनाने काही उपाययोजना आखल्या आहेत. त्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा तात्पुरता कमी अथवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.
सुरुवातीला या परिस्थितीमुळे अनेक हॉटेल्सचे कामकाज विस्कळीत झाले होते. मात्र आता परिस्थितीशी जुळवून घेत हॉटेल चालकांनी पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. लाकूडफाटा व इतर पर्यायांचा वापर करून ग्राहकांना सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पर्याय निवडला गॅस
सिलिंडर मिळत नसल्यामुळे आम्हाला चुलीवर पदार्थ बनवावे लागत आहे. परंतु त्यामुळे वेळ जास्त लागतो आहे. तरी देखील आम्ही ग्राहकांची सेवा थांबवू शकत नाही. त्यामुळे आम्ही पर्यायाने चुलीचा वापर करत आहोत. राधेश्याम खैरे, हॉटेल चालक, बदनापूर