

Great response in Latur to joint survey of Shaktipeeth Highway
लातूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर गोवा शक्तीपीठ शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग उभारणीला आता राज्यभरातून गती मिळत आहे. ज्या जिल्ह्यांमधून शक्तीपीठ महामार्ग जात आहे त्या जिल्ह्यांतील शेतकरी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीच्या संयुक्त मोजणीला उत्तम प्रतिसाद दर्शवत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर, सांगली येथील शेतकऱ्यांनी संयुक्त जमीन मोजणीसाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाला सहमती दर्शवत चांगला प्रतिसाद दर्शविला. यामुळे या भागांमधील महामार्गाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादन प्रक्रियेला गती मिळत आहे. याच पद्धतीने लातूर येथील शेतकऱ्यांनी देखील संयुक्त जमिनीच्या मोजणीच्या प्रक्रियेत सहभाग दर्शविला आहे. यामुळे हळूहळू येथील कामाला देखील गती मिळताना दिसून येत आहे.
जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाचा ४३.१७ किमी लांबीचा मार्ग जातो. यामध्ये जिल्ह्यातून लातूर, रेणापूर, औसा या तालुक्यांतील २२ गावांमधून हा मार्ग जात आहे. येथील बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीची नुकतीच संयुक्त मोजणीची प्रक्रिया पार पडली. यावेळी शेतकऱ्यांनी स्वतःहून प्रक्रियेत सहभाग घेऊन त्यांच्या जमीन मोजणीसाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले.
शेतकऱ्यांच्या उस्फुर्त प्रतिसादामुळे विविध जिल्ह्यांमधे महामार्गाच्या उभारणीबाबत एक सकारात्मक चित्र देखील समोर येत आहे. लातूर तालुक्यातून महामार्गाचा एक मोठा भाग जात आहे. याबाबत लातूरच्या उपविभागीय अधीकारी रोहिणी नन्हे वीरोळे यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने शक्तीपीठ महामार्ग हा महत्वाचा मार्ग आहे. या मार्गाचा महत्वाचा टप्पा लातूर तालुक्यातील १३ गावांमधून जाणार आहे. साधारण २६ किमी लांबीचा भाग लातूर तालुक्यातून जाणार आहे. तर यासाठी २७५ हेक्टर जागा संपादन करावी लागणार आहे. संयुक्त जमीन मोजणीच्या प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेले संभ्रम दूर करण्यात आले. तसेच या महामार्गाचे फायदे देखील शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले.