

One and a half crores will be provided as aid before Diwali; Information from MLA Abhimanyu Pawar
लातूर, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीमुळे औसा मतदारसंघातील शेतकऱ्यांवर आणि ग्रामस्थांवर मोठे संकट ओढावले असताना, दिवाळीपूर्वी त्यांच्या घरात आशेचा नवा दीप उजळला आहे.
आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकाराने क्रीएटीव्ह फाउंडेशन आणि अभय भुतडा फाउंडेशन यांच्या माध्यमातून १२०० कुटुंबांना सुमारे सव्वा कोटी रुपयांची थेट आर्थिक आणि अन्नधान्य स्वरूपातील मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत १५ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कृषिरत्न बी.बी. ठोंबरे यांच्या हस्ते वितरित होणार आहे. औसा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे, जनावरांचे आणि घरगुती वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दत्ता भरणे आणि पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे पाठपुरावा करून ३१,००० कोटी रुपयांची ऐतिहासिक शासकीय नुकसानभरपाई जाहीर करून घेतली. या पार्श्वभूमीवर औसातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार पवार यांनी 'औसा पॅटर्न', मदतीचा कार्यभाग आणि विकासाचा लेखाजोखा मांडला.
ते म्हणाले, ही मदत म्हणजे केवळ पैसे नाहीत, तर संकटातून उभं राहण्यासाठीचा आत्मविश्वास आहे. कोणतीही बँक शासकीय नुकसानभरपाई थकबाकीच्या नावाखाली कपात करू शकत नाही, असा प्रकार झाल्यास थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. बैल दगावला तर पुन्हा बैल घ्या, गाय गमावली तर गायच घ्या हीच खरी मदतीची दिशा आहे, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना भावनिक आवाहन केले.
औसा मतदारसंघातील बदल तुम्ही स्वतः अनुभवावा आणि समाजापर्यंत पोहोचवावा, असेआवाहन त्यांनी पत्रकारांना केले. या पत्रकार परिषदेस या पत्रकार परिषदेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती भीमाशंकर राचट्टे, तालुकाप्रमुख सुभाष जाधव, औसा मंडळ अध्यक्ष शिव मुरगे, प्रा सुधीर पोतदार, माजी शहराध्यक्ष लहू कांबळे, कल्पना डांगे, अक्रम खान, नाना धुमाळ, वृषाल देशमुख, यांनी प्रविण कोपरकर, सदाशिव जोगदंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
'एक हात मदतीचा, विचार माणुसकीचा' या भावनेतून साकारलेला 'औसा पॅटर्न' आता समाजसेवेचा प्रेरणादायी आदर्श बनला आहे. दिवाळीपूर्वी १२०० कुटुंबांच्या घरात प्रकाश देणारी ही मदत औसा तालुक्यातील नव्या आशेचा दीप ठरली आहे.