

Free treatment up to Rs 5 lakh only if you have an Ayushman card
संग्राम वाघमारे
चाकूर : आयुष्मान भारत योजने अंतर्गत केंद्र शासनाने नागरिकांकडे आयुष्मान कार्ड' असेल तरच त्यांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड काढणे अनिवार्य आहे.
चाकूर तालुक्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून ९८ हजार ५०० नागरिकांनी आतापर्यंत आपले आयुष्मान कार्ड काढले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाने दिली आहे. सर्व सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाला नोंदणीसाठी आयुष्मान कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.
आयुष्मान भारत योजनेंतर्गत गोल्डन कार्ड काढण्यासाठी गावातील सरकारी दवाखाने, ग्रामपंचायत, याठिकाणी हे कार्ड मोफत काढून दिले जाते. जवळील सीएससी केंद्र, आपले सरकार केंद्र या ठिकाणीदेखील हे कार्ड काढता येते. हे एक सरकारी आरोग्य विमा कार्ड आहे.
हे कार्ड प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू कुटुंबांना कॅशलेस आरोग्य सेवा पुरवण्यासाठी दिले जाते. हे कार्ड देशभरातील रुग्णालयांमध्ये चालते. चाकूर तालुक्यामध्ये १ लाख ७८ हजार ७४५ एवढ्या लोकसंख्यापैकी १ लाख ६७ हजार लोकांनी आभा कार्डवर आपली नोंदणी केली आहे. परंतु त्यातील ९८ हजार ५०० जणांनीच आयुष्मान कार्ड काढले आहे.
५३ हजार १४९ जणांना आयुष्मान कार्डचे वाटपही करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यात सरकारी १६ आणि खासगी २७अशी ४३ रुग्णालये या योजनेसाठी सेवा देतात. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाला नोंदणी करावी लागते. त्या नोंदणीसाठी आता आयुष्मान कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी हे कार्ड काढणे महत्त्वाचे आहे. चाकूर तालुक्यातील जवळपास ८० हजार जणांनी अद्याप आयुष्मान कार्ड काढले नाहीत. त्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न चालवले जात आहेत.
मोबाइलमध्ये गुगल प्ले स्टोअरमधून आयुष्यमान अॅप डाऊनलोड व इन्स्टॉल करावे, त्यानंतर आधार फेस आयडी अॅप इंस्टॉल करावे. आयुष्मान अॅपमध्ये बेनिफिशरी लॉगिन पर्यावाची निवड करावी, मोबाईल ओटीपीच्या साह्याने लॉगिन करावे. त्यानंतर सर्च पर्यायांमध्ये नाव, आधार कार्ड क्रमांक आणि रेशन कार्ड ऑनलाइन आयडीद्वारे पात्र लाभार्थी शोधता येते. यानंतर पात्र लाभार्थी यांची ई-केवायसी आधार कार्डशी संलग्न मोबाइल क्रमांकावर ओटीपी किंवा फेस ऑथच्या माध्यमातून पूर्ण करता येते.