

Latur Farmer News
बुलढाणा : लातूर जिल्ह्यातील हाडोळती (ता. अहमदपूर) येथील अंबादास गोविंद पवार या ७६ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याकडे शेतातील मशागतीसाठी बैलजोडी नसल्याने ते आणि त्यांची वृद्ध पत्नी स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन शेतात बैलासारखे काबाडकष्ट करत होते. या शेतकरी दाम्पत्याच्या जीवनसंघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी 'त्या' कष्टकरी वृद्ध दाम्पत्याला बैलजोडी भेट देणार असल्याचे जाहीर केले.
आमदार गायकवाड यांनी हाडोळती या गावातील शेतकरी अंबादास पवार यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांची विचारपूस केली. त्यांना शेतीच्या कामासाठी बैलजोडी भेट म्हणून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे विकत घेतली जाणारी बैलजोडी ही शेतकरी अंबादास पवार यांनी त्यांच्या पसंतीने निवडायची आहे. शनिवार ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता हाडोळती (जि. लातूर) गावी जाऊन संजय गायकवाड हे स्वतः बैलजोडी त्या गरजू शेतकऱ्याला देणार आहेत. यासोबतच, शेतीसाठी लागणारी आवश्यक अवजारेही ते देणार आहेत.
"मी सुद्धा अशा प्रसंगातून गेलो आहे. एका बैल आकस्मिकपणे मेल्यानंतर मी स्वतः खांद्यावर जोतं घेऊन शेतीत कामे केली आहेत. म्हणूनच वृद्ध शेतकरी अंबादास पवार यांचं दुःख मला खूप जवळचं वाटतं," अशी भावना आमदार गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.