

For the first time in twenty years, the Vati project was 100 percent filled.
विठ्ठल कटके
रेणापूर : रेणापूर तालुक्यातील व्हटी प्रकल्पावर किनगाव सहा खेडी व इतर गावांच्या पाणी पुरवठा योजना कार्यान्वयीत आहेत. शिवाय या पाण्याचा १ हजार ७६० हेक्टर जमीनीवरील पिकांना त्याचा फायदा होणार आहे मागील २० वर्ष सतत कोरडा राहिलेला हा प्रकल्प शंभर टक्के भरल्याने या भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असुन ऊस व इतर पिकांच्या क्षेत्रात वाढ होणार आहे.
रेणापूर तालुक्यात रेणा व व्हटी हे दोन मध्यम प्रकल्प मोठे आहेत. रेणा मध्यम प्रकल्पावर रेणापूर दहा खेडी, पानगाव बारा खेडी, कामखेडा पाच खेडी, पट्टीवडगाव, खरोळा तर व्हटी प्रकल्पावर किनगाव सहा खेडी, महाळंगी, गोढाळा, व्हटी १ व २, सायगाव, सताळा या गावांच्या नळयोजना अवलांबुन आहेत. मागील पंधरा ते वीस वर्षापासून व्हटी प्रकल्पात कमी अधिक पाणी साठा होत राहिला.
त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबुन असलेल्या नळयोजना पुर्ण क्षमतेने चालल्या नाहीत. सततच जनतेला पाण्याचे मोठे दुर्भिक्ष जाणवत असे त्यामुळे बोअर व विहिरी अधिग्रहण करून जनतेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत असे. शिवाय सिंचनासाठी प्रकल्पातुन पाणी पुरवठा होत नसे. मागील वर्षापासून हा प्रकत्प शंभर टक्के भरल्याने जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागुन सिंचनासाठीही मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.
२०१६ १७ सालात प्रकल्पातून गाळाचा मोठ्या प्रमाणात उपसा केल्यामुळे प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी वाढ होत आहे. शिवाय शेकडो एकर जमीनीवर गाळ टाकल्यामुळे जमीन सुपीक बनली असुन मोठ्या प्रमाणात पिकांच्या उत्पादनात वाढ होत आहे. तालुक्यातील लहान पाझर तलाव, सिमेंट बंधारे व ओढे, नाल्यानाही पाणी आल्याने ते सध्या भरभरून वाहत आहेत. ओढ्यातील वाहुन जाणारे पाणी अडविण्यासाठी कांही वर्षापूर्वी लोकसहभागातुन वनराई बंधारे बांधण्याची योजना राबविली होती.
त्यात ६५ बंधारे बांधण्यात आली होती. नंतर त्याची डागडुजी न केल्याने आज कांही ठिकाणचे वनराई बंधारे अस्तीत्वात नाहीत. ओढ्याचे वाहुन जाणारे पाणी अडविले तर त्याचा फायदा शेतीसाठी व जनावरांच्या पिण्यासाठी होऊन आजुबाजुच्या बोअर व विहिरीची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. तालुक्यातील गरसुळी, मोरवड, आनंदवाडी सारोळा, माकेगाव, रामवाडी, वांगदरी, सय्यदपुर पानगाव, निवाडा, कुंभारवाडी, कोळगाव समसापुर, कोष्टगाव, कारेपुर या साठवण तलावात यावर्षी मोठा जलसाठा झालेला आहे. तसेच सर्वच शेततळी पाण्याने तुडुंब भरली आहेत.
व्हटी प्रकल्पाची सध्याची पाणी पातळी ५४९. ९० मिमी असून एकुण पाणीसाठा ९. ५१२ दलघमी इतका झालेला आहे. तर मृतसाठा १.२४२ दलघमी असुन उपयुक्त जलसाठा ८. २७० दलघमी एवढा आहे. सध्या पाण्याचा येवा सुरुच आहे. प्रकल्प शंभर टक्के भरल्याने सर्व नळयोजना पुर्ण क्षमतेने सुरू राहतील व १ हजार ७६० हेक्टर जमीनीवरील पीकांनाही या पाण्याचा उपयोग होईल.