

Eight youths booked for celebrating birthday on the street
लातूर, पुढारी वृत्तसेवा : मध्यरात्री सार्वजनिक रस्त्यावर गोंधळ घालत वाढदिवस साजरा करणे युवकांना भोवले नागरिकांना त्रास देणाऱ्या अशा युवकांच्या समूहावर स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ कारवाई करीत सात जणांविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवले.
मयूर मारुती कावळे (वय २१ रा. खाडगाव रोड) आदित्य लक्ष्मण देशमुख (वय २१ रा. खाडगाव रोड), गौरीशंकर शिवमूर्ती दरेकर (वय २२, रा. सलगरा खुर्द), श्रीकृष्ण राजाभाऊ बोराडे (वय २१रा. येळी), समर्थ नवनाथ श्रीराम (वय २०), सुदर्शन लक्ष्मण फुलगमवार ( वय २१ रा. नरसी, नायगाव नांदेड), कृष्णा राजाराम ताटेवाड (वय २१, रा. नरसी, नायगाव नांदेड) अजय बनसिंग भुजबळ (वय २१, रा. जोडजोवळा) अशी त्यांची नावे आहेत.
१९ नोव्हेंबर रोजी रात्री छत्रपती शिवाजी चौक ते पीव्हीआरकडे जाणाऱ्या रिंग रोडवर काही युवकांनी आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी वाहनांची ये-जा पूर्णपणे अडवून मोठ्या आवाजात संगीत वाजवणे, फटाके फोडणे, आरडाओरडा करणे आणि गडबड करणे सुरू केले होते. यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.
गस्तीवरील पोलिसांना हा प्रकार दिसताच स्थानिक गुन्हे शाखेचे पेट्रोलिंग पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि सुरू असलेला गोंधळ तातडीने थांबवला. वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली सार्वजनिक शांततेचा भंग करणे, रस्ता अडवून वाहतुकीला अडथळा निर्माण करणे आणि नागरिकांना त्रास देणे या कारणांवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात संबंधित युवकांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय मोद देशमुख, पोलिस अमलदार मोहन सुरवसे आणि राहुल कांबळे यांनी केली.
वाढदिवस, पार्टी किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी गोंधळ करणे, साऊंड लावणे, डान्स पार्टी किंवा फटाके फोडणे हे कायद्याने दंडनीय असून अशा घटना आढळल्यास नियंत्रण कक्ष ०२३८२-२४२२९६ / ११२ वर तत्काळ कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन लातूर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.