

लातूर : छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेल्या नशेच्या सीरप साठ्याचे धागेदोरे थेट लातूर जिल्ह्यातील उदगीरपर्यंत पोहोचले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, उदगीर येथील ज्या ‘मराठवाडा मेडिकल’च्या नावाने हा कारभार सुरू होता, ते दुकान जागेवर अस्तित्वातच नसून केवळ कागदोपत्री सुरू असल्याचे तपासात उघड झाले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने संबंधित दुकानाचा परवाना रद्द करण्याची धडक कारवाई हाती घेतली आहे.
छत्रपती संभाजीनगर एलसीबीने कारवाई करत मोठा सीरपचा साठा जप्त केला होता. या प्रकरणाचा तपास केला असता, त्याचे कनेक्शन उदगीरमधील ‘मराठवाडा मेडिकल’शी असल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे लातूरचे औषध निरीक्षक आणि पथक उदगीर येथील संबंधित दुकानाच्या पत्त्यावर पोहोचले. मात्र, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मेडिकल दुकान आढळून आले नाही. केवळ कागदपत्रांवर दुकान दाखवून त्याआधारे नशेच्या औषधांचा गोरखधंदा सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणाची एफडीएने गंभीर दखल घेतली असून, संबंधित बोगस दुकानाचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. “नशेच्या औषधांची कोणीही अवैध प्रकारे खरेदी-विक्री करत असेल, तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल,“ असा सज्जड दम लातूरचे औषध निरीक्षक बळीराम मरेवाड यांनी दिला आहे.
विनाबिलाने परराज्यातून तस्करी
दुकान मालक या रॅकेटमध्ये सामील असून, परराज्यातून हे सीरप मागवले जात होते. माल ट्रान्सपोर्टने लातूर शहरात यायचा आणि तेथून दुकानात न नेता थेट छत्रपती संभाजीनगर येथे विनाबिलाने पाठवला जात असे. औषध खरेदी-विक्रीसाठी आवश्यक असलेल्या खरेदीच्या पावत्या किंवा कोणताही पुरावा संबंधित दुकान मालकाला सादर करता आला नाही. बंद दुकानाच्या नावाचा वापर करून हा काळाबाजार सुरू होता.