

वडीगोद्री : अजितदादांच्या निधनाची बातमी मनाला पटत नाही. त्यांच्या जाण्याने राज्याचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. गरिबांचा आधारवड आणि स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जाणारे अजितदादांसारखे नेतृत्व पुन्हा होणे कठीण आहे, अशा शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
अजित पवार यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील म्हणाले, दादा हे राज्याचा आणि गोरगरिबांचा मोठा आधार होते. त्यांची कामाची पद्धत, स्पष्ट वक्तृत्व आणि प्रशासनावरील पकड ही त्यांची वेगळी ओळख होती. आज आमच्या समाजाचा आणि राज्याचा आधार गेला आहे. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी मनोज जरांगे यांनी बारामती येथे जाऊन अजित पवार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आणि पवार कुटुंबियांचे सांत्वन केले. दादा आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही, असे म्हणत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.