

Damage assessments completed for 22,522 hectares in Renapur Taluka
रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : एकीकडे मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची घोषणा करीत आहेत, तर दुसरीकडे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा घाट घातला जात आहे. सरसकट मदतच देणार असाल तर पंचनामे कशासाठी, असा सवाल रेणापूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित करीत आहेत. पंचनाम्यांसाठी विविध कागदपत्रे, दोन साक्षीदारांच्या सह्या आणि शेतकऱ्याची स्वाक्षरी अशा प्रक्रियेत शेतकरी अडकले आहेत.
राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याचा शासन निर्णय २५ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केला. त्यानंतर रेणापूर तालुक्यात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहेत. रेणापूर, पानगाव, पळशी, कारेपूर आणि पोहरेगाव या पाच महसूल मंडळांमध्ये मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकरी व पंचांच्या उपस्थितीत पंचनामे करीत आहेत.
तालुक्यात आतापर्यंत २२ हजार ५२२ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित पंचनाम्यांचे कामही वेगाने सुरू आहे. रेणापूर महसूल मंडळात मंडळ अधिकारी संजय घाडगे, तलाठी कलीम शेख, सहाय्यक कृषी अधिकारी अमोल नागरगोजे आणि महसूल सेवक उत्तम राठोड यांच्या पथकाने ४ ऑक्टोबरपर्यंत ४ हजार ११८ खातेदार शेतकऱ्यांच्या ३ हजार ९०१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे पूर्ण केले आहेत.
पंचनाम्याच्या नमुन्यात शेतकऱ्याचे नाव, आठ-अनुसार एकूण क्षेत्र, बाधित गट क्रमांक, बाधित पिकाचे नाव, बाधित क्षेत्र, नुकसानीची टक्केवारी, फार्मर आयडी किंवा आधार क्रमांक, बँकेचे नाव, आयएफएससी कोड आणि खाते क्रमांक अशी माहिती घेतली जात आहे. त्यानंतर पंचनाम्याच्या फॉर्मवर दोन साक्षीदार पंच आणि संबंधित शेतकऱ्याची स्वाक्षरी घेतली जात आहे. पंचनाम्यासाठी तीन सदस्यांचे पथक शेतावर येत असल्याने शेतकऱ्यांना दोन साक्षीदार सोबत ठेवावे लागत आहेत. दिवसभर अधिकारी शेतावर येण्याची वाट पाहावी लागत असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार आहे. पंचनाम्याच्या या प्रक्रियेनंतर केंद्रीय पथकाच्या आढाव्यानंतर मदत मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
विलासरावांच्या मदतीची शेतकऱ्यांना आठवण
२००३-०४ मध्ये रेणापूर तालुक्यात लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. सोयाबीनचे उभे पीक अळीने फस्त केले होते. त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. ते परदेशात असताना तत्कालीन महसूल मंत्री व लातूरचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रेणापूर तालुक्यातील सोयाबीन पिकांची पाहणी करून परिस्थितीची माहिती त्यांना दिली होती. केंद्राच्या पथकाची वाट न पाहता आणि कोणत्याही कागदपत्रांची अट न घालता शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात आली होती. अवघ्या आठवडाभरात मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती.
पंचनामे न करता सरसकट मदत देण्याची मागणी
रेणापूर तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे एका बाजूला सरसकट मदतीची घोषणा आणि दुसऱ्या बाजूला पंचनामे व कागदपत्रांची सक्ती का, असा सवाल शेतकरी करीत आहेत. शासनाच्या या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंचनाम्याची अट न घालता दुष्काळग्रस्त सर्व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. पंचनाम्यासाठी अधिकारी कधी येणार, याची प्रतीक्षा करीत शेतकऱ्यांना दिवसभर शेतात थांबावे लागत आहे.