

उदगीर: उदगीर शहरात विनापरवाना अवैध सावकारी करणाऱ्यावर अखेर प्रशासनाचा बडगा पडला आहे. मिनी उद्योग भवन परिसरातील रहिवासी सुधीर जगन्नाथ पारसेवार यांच्या राहत्या घरावर सहकार विभाग आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने ५ ऑक्टोबर रोजी छापा टाकला. या कारवाईने उदगीरमधील अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात विनापरवाना अवैध सावकारी व्यवहार सुरू असल्याची तक्रार सहकार विभागाकडे आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पथकाने पारसेवार यांच्या घराची झडती घेतली असता, तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात संशयास्पद कागदपत्रे आढळून आली. यामध्ये लोकांकडून लिहून घेतलेले कोरे बॉण्ड, कोरे धनादेश (चेक), व्याजाचा उल्लेख असलेल्या हिशोबाच्या वह्या आणि जमीन खरेदी-विक्रीच्या दस्तऐवजांच्या प्रती असा मुद्देमाल पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे.
सावकारी कायद्यांतर्गत पुढील कायदेशीर चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही संपूर्ण कारवाई लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण व जिल्हा उपनिबंधक विष्णू पोतांगळे यांच्या नियंत्रणाखाली पार पडली.
या मोहिमेत उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर आणि शहर पोलीस निरीक्षक यांनी प्रशासकीय मदत पुरवली, तर पथक प्रमुख म्हणून सहायक निबंधक अश्विनी पुढेवाड यांनी कामकाज पाहिले. यावेळी शासकीय दूध योजना विभागातील कर्मचाऱ्यांनी पंच म्हणून काम पाहिले. दरम्यान, जिल्ह्यात कोणीही विनापरवाना अवैध सावकारी करत असेल, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना जादा व्याजदराने कर्ज देऊन लुबाडत असेल तर त्याबाबत लातूर येथील जिल्हा उपनिबंधक (सावकारी) कार्यालय किंवा आपल्या तालुक्यातील सहायक निबंधक कार्यालयाकडे तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवून दोषींवर तात्काळ कारवाई केली जाईल, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे.