

औसा : हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात शेतात बांधलेली गायीचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.१९) सकाळी तालुक्यातील लखनगाव परिसरात उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
अजित कदम हे आपली गाय शेतात बांधून सांयकाळी शेतातील काम आटपून घरी जातात. पहाटेच्या सुमारास ते कामासाठी शेतात गेले असता त्यांना त्यांची गाय मृत अवस्थेत आढळून आली. तिच्यावर एका हिस्र प्राण्याने हल्ला केल्याचे निदर्शनास आले. तसेच घटनास्थळी हिस्र प्राण्यांच्या पायाचे ठसे आढळून आले. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हिस्र प्राण्याच्या पायांचे ठसे तपासले. प्राथमिक अंदाजानुसार हे ठसे वाघ, बिबट्या किंवा अन्य हिंस्त्र प्राण्याचे असण्याची शक्यता आहे, पण नेमका प्राणी कोणता? हे सध्या तरी सांगणे कठीण आहे, असे अधिकारी शिंदे यांनी सांगितले. ठसे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवालानंतर नेमकं प्राणी कोणता होता, हे स्पष्ट होणार आहे.
हिस्र प्राण्यांच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू झाला. हिस्र प्राण्याच्या पायाचे ठसे घटनास्थळी दिसून आले असून या घटनेमुळे गावकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे तात्काळ या हिंस्त्र प्राण्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी जोरदार मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.