

भूम, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सरमकुंडी गावात बिबट्याने गायीवर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२७ डिसेंबर रोजी रात्री ८.४० वाजता ट्रॅप कॅमेरामध्ये बिबट्या कैद झाला आहे.
ही घटना सुदाम हाके यांच्या गावठाण तलावाजवळील शेतीमध्ये घडली असून बिबट्याने गाईवर हल्ला केला. मागील काही दिवसांपासून भूम तालुक्यात बिबट्या किंवा त्याच्यासारखा प्राणी दिसत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आता ट्रॅप कॅमेराच्या मदतीने बिबट्याचा वावर निश्चित झाला आहे. वन विभागाचे वनरक्षक जवान तिथे जाऊन पाहणी करून बिबट्याचा शोध घेण्यासाठी पार्डी परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.
वन विभागाचे अधिकारी दीपक गांदले, व वनरक्षक गजानन दाडगे, सागर जागताप, संकेत यांनी सांगितले की, मागील काही महिन्यांत मुक्या जनावरांवर तसेच काही ठिकाणी लोकांवरही बिबट्याने हल्ले केले आहेत. मात्रेवाडी येथेही अशाच प्रकारची घटना घडली होती.
सध्या वन विभाग बिबट्याचा शोध घेत असून अद्याप त्याला पकडण्यात यश आलेले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.