

Cooperation Minister Babasaheb Patil spoke to the elderly farmer couple over the phone.
लातूर, पुढारी वृतसेवा : लातूरः हाडोळती, ता. अहमदपूर येथील अंबादास पवार व मुक्ताबाई पवार हे दाम्पत्य वैलाऐवजी स्वतःला जुंपून मशागत करत असल्याचे दृश्य माध्यमांतून प्रसिद्ध होताच राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेव पाटील यांनी या वृद्ध शेतकरी दाम्पत्यास थेट फोन करून त्यांच्यावर असलेले कर्ज फेडण्याचे व बी-बियाणांसाठी पैसे देण्याची हमी दिली.
गेली दोन दिवसांपासून अंबादास पवार व मुक्ताबाई पवार हे आपल्या शेतात बैलाऐवजी स्वतःला जुंपून घेऊन मशागत करत असल्याचे दृश्य व्हायरल झाले होते. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बुधवारी थेट त्या शेतकऱ्याला फोन करून त्याच्याकडे असलेल्या कर्जाची माहिती घेतली व ते ४० हजार रुपयांचे कर्ज भरण्याचे आणि त्यांना लागणाऱ्या बी-बियाणे यासाठी मदत करण्याची हमी दिली.
अंबादास पवार व मुक्ताबाई पवार यांना ५ एकर कोरडवाहू जमीन आहे. गेली दहावर्षांपासून ते बैलाऐवजी स्वतःला जुंपून घेत शेती करतात, असे त्यांनी सांगितले. आता वृद्धावस्थेत शेती करणे अवघड झाले आहे. मुलगा पुण्याला कोठेतरी खाजगी नोकरी करतो, असे त्यांनी सांगितले व बैल बारदाणा करणे किंवा शेती करणे परवडत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी बोलत असताना अंबादास पवार यांनी आमच्यावर असलेले कर्ज भरा व बी-बियाणे यासाठी मदत करा. तसेच आमच्या मुलांना नोकरीसाठीही प्रयत्न करा, अशी विनंती केली. या दाम्पत्याचा मुलगा पुणे येथे रोजंदारीवर असून, गावात सून, नातू राहतो. तसेच मुलीचाही विवाह त्यांनी हलाखीची परिस्थिती असतानाही करून दिला आहे, हे विशेष.