

अहमदपूर, पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या हिवाळ्यात मागच्या चार दिवसांपासून वातावरणात गारठा निर्माण झाला असून हाच गारठा रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी लाभदायक असल्याने रब्बी ज्वारी पिकांसाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. यंदाच्या पावसाळ्यात जोरदार व जोमात अतिवृष्टी झाल्याने पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे.
शिवाय जमिनीत ओलावा टिकून असल्याने रब्बी पिकांसाठी पोषण वातावरण तयार झाले होते याचा वातावरण अनेक शेतकऱ्यांनी फायदा घेत रब्बीतील ज्वारी, हरभरा, गहू, करडई आदी पिकांची लागवड केली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात हरभरा १०,००० हेक्टर, ज्वारी ६५०० हेक्टर, करडई २००० हेक्टर व गहू जवळपास १००० हेक्टरवर लागवड केली असून यावर्षी झालेला चांगला पाऊस आणि त्यामुळे जमिनीत दीर्घकाळ टिकून राहिलेला ओलावा महत्त्वाच्या घटकांनी रब्बी पिकांसाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार केले आहे.
याचा परिणाम म्हणून रब्बी पिकांची वाढ सध्या अत्यंत समाधानकारक दिसत आहे. हरभरा हे तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र व्यापणारे प्रमुख रब्बी पीके ठरले असले तरी सर्वसामान्य ताटात दररोज आढणारी भाकरी ही मात्र ज्वारीची असते त्यामुळे या पिकाला विशेष महत्त्व आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी एम. ३५ १ मलदांडी ज्व ारीच्या लोकप्रिय प्रकार विविध जाती आणि बहरलेली ज्वारी लागवड केली आहे. थंडी सहन करण्याची क्षमता आणि दाणे भरपूर देण्याच्या गुणधर्मामुळे ही जात शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे.
याशिवाय, कोरडवाहू परिस्थितीत तग धरणारी फुलझडी, दाण्यांच्या चांगल्या आकारामुळे बाजारात मागणी असलेली १८, तसेच उशीरा पेरणीस योग्य आणि दाणे चांगले भरणारी -२२ यांसारख्या विविध जातींची पेरणी झाल्याने तालुक्यातील एकूण उत्पादनक्षमता वाढण्याची शक्यता कृषीतज्ञ व्यक्त करत आहेत.
बाराघाटच्या डोंगररांगांच्या भौगोलिक स्थितीमुळे अहमदपूर तालुक्यात रब्बी पिकांची पेरणी सामान्यतः कमी असते. मात्र, यंदा पाण्याची उत्तम उपलब्धता, साठलेले पाणी आणि जमिनीतील योग्य ओलाव्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीवर भर दिला. विशेषतः ज्वारीच्या पिकावर सध्या थंडीचा उत्तम परिणाम दिसत आहे. रोपे दमदार वाढ उत्तमरित्या सुरू आहे, ज्यामुळे उत्पादन वाढण्याची आशा वाढली आहे. यंदा खरीप हंगामात झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी काहीसे चिंतित होते. मात्र, रब्बी हंगामाची सुरुवात पाहता, शेतकऱ्यांच्या मनात खरीपचे नुकसान भरून निघण्याची प्रबळ आशा निर्माण झाली आहे. तालुक्यात सर्वाधिक रब्बी हंगामात हरभरा पेरला जातो तो जवळपास दहा ते अकरा हजार पर्यंत एवढा आहे. यामुळे यंदाचा रब्बी हंगाम तालुक्याच्या अर्थव्यवस्थेसाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत ठरू शकतो, असा विश्वास शेतकरी व कृषीतज्ञ दोघांनीही व्यक्त केला आहे. आगामी काही दिवस हवामान असेच स्थिर राहिल्यास, यंदाचा रब्बी हंगाम गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अधिक यशस्वी ठरणार, यात शंका नाही.